वैज्ञानिकांच्या संशोधनातून खुलासा
नामीबियातील वाळवंटी क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो, तरीही तेथे अत्यंत अजब आणि ओबडधोबड गवत उगवून फैलावलेले आहे. येथील वातावरण अत्यंत प्रतिकूल असल्याने येथे गवत उगवणे चकित करणारे आहे. परंतु यातच रहस्य देखील सामावलेले आहे.
हे ठिकाण नामीबियाच्या सागरी किनाऱयापासून 80-140 किलोमीटर अंतरावर आहे. गवताळ मैदानात गोल आकाराचे भूभाग अनेक मैल अंतरावरूनही दिसून येतात. एक सामान्य फेयरी सर्कल 2-10 मीटरपर्यंत मोठे असू शकते आणि उर्वरित वर्तुळाकृतींपासून याचे अंतर 10 मीटर इतके आहे.
नामीबियाच्या या अजब फेयरी सर्कलच्या रहस्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहेत. यात दोन थेअरी महत्त्वाच्या आहेत. एका थेअरीनुसार हे फेयरी सर्कल वाळवीमुळे निर्माण होते. तर दुसऱया थेअरीनुसार येथील गवत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी गोलाकार धारण करत आहे. परंतु 2016 मध्ये ऑस्ट्रेलियातही अशाप्रकारचे आकार दिसून आला, तेथे वाळवीचे अस्तित्व देखील ननव्हते. यामुळे या दोन्ही थेअरींवर विश्वास ठेवणे अवघड झाले होते आता अलिकडेच झालेल्या एका संशोधनाने दुसऱया थेअरीला बळ मिळाले आहे. यात गवत कमी पावसाचा अधिकाधिक लाभ मिळविण्यासाठी अशाप्रकारचा वर्तुळाकार धारण करत असल्याचे मानले गेले आहे.
जर्मनीच्या गोएटिंगेन विद्यापीठात ईकोसिस्टीम मॉडेलिंग डिपार्टमेंटच्या स्टीफन गेटजिन यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन पर्सपेक्टिव्ह्ज इन प्लँट इकोलॉजी, इव्होल्युशन अँड सिस्टेमॅटिक्समध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी याला टय़ूरिंग पॅटर्नचे उदाहरण ठरविले आहे.
गेटजिन आणि त्यांच्या पथकाने नामीबियात पोहोचून तेथील 10 भागांमध्ये फेयरी सर्कलचे अध्ययन केले आहे. या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो. पावसानंतर वर्तुळात गवत दिसून येते, परंतु ते लवकरच मरून जाते. तर काठावरील गवत तग धरून राहते असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी गवत, त्याचे मूळ आणि अंकुरांचे अध्ययन केले. तसेच पावसानंतर गवत कुठल्या स्थितीत मरून जाते याचीही तपासणी केली आहे. वर्तुळाकृतींच्या आत आणि आसपास मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर वैज्ञानिकांनी बसविले हेते.
पावसाच्या 10 दिवसांनी फेयरी सर्कलच आत खूपच कमी गवत उगवले होते आणि नव्याने उगवलेले गवत मरू लागले होते असे संशोधनात आढळून आले आहे. पावसाच्या 20 दिवसांनी सर्कलमध्ये उगवलेले सर्व गवत मरून गेले हेते. तर आसपासचे गवत हिरवेगार होते. वर्तुळाकृतीतील मरून गेलेल्या गवताची मूळं तुलनेत लांब होती.