टेक्निकल कोअरमधील सर्वोच्च पद
प्रतिनिधी /सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील डोंगरपाल गावचे सुपुत्र मेजर जनरल कुलभूषण गवस यांची भारतीय आर्मीच्या लेफ्टनंट जनरलपदी नियुक्ती झाली आहे. सैन्यदलातील सेवेची 37 वर्षे पूर्ण करणारे गवस हे ‘कोअर ऑफ सिग्नल युनिट’चे सदस्य आहेत. लेफ्टनंट जनरल हे भारतीय सेनेतील क्रमांक दोनचे तर टेक्निकल कोअरमधील सर्वोच्च पद म्हणून ओळखले जाते.
बांदा लगतच्या डोंगरपाल गावचे सुपुत्र असलेल्या गवस यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव येथील सेंट झेवियर स्कूल तर माध्यमिक शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूल मध्ये झाले. त्यांचे वडील कै. हनुमंत गवस यांनी देखील भारतीय सैन्यदलात सेवा दिली होती. तर त्यांच्या मातोश्री बेळगाव येथील म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेत शिक्षिका म्हणून सेवा देत होत्या. गवस यांचे आजोबा कै. लक्ष्मण गवस हे देखील भारतीय सैन्यात होते. पहिल्या महायुद्धात त्यांचा सहभाग होता. डोंगरपाल गावातून सैन्यात भरती होणारे पहिले युवक म्हणून कै. लक्ष्मण गवस यांना ओळखलं जातं.
एन.डी.ए.चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1985 मध्ये भारतीय सेनेच्या कोअर ऑफ सिग्नल युनिटमध्ये अधिकारी म्हणून ते रुजू झाले व त्यानंतर यशाचा एक-एक टप्पा पार करत ते लेफ्टनंट जनरल या अतिउच्च पदावर पोहोचले. कुलभूषण यांची ही नियुक्ती कोकण व तमाम सिंधुदुर्गवासियांच्यादृष्टीने अभिमानास्पद अशी आहे. भारतीय सैन्यदलात अतिउच्च पदावर पोहोचणाऱया कोकणातील हाताच्या बोटावर मोजता येतील, अशा निवडक अधिकाऱयांमध्ये त्यांचा समावेश आहे.
भारतीय सैन्यदलातील सर्वोत्कृष्ट अशा निवडक वरिष्ठ अधिकाऱयांपैकी एक अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक देशांमध्ये त्यांनी भारतीय आर्मीने दिलेली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली आहे. त्यांच्या या सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेक सेवा मेडल्स प्राप्त झाली आहेत. कुलभूषण गवस यांच्या या नियुक्तीबद्दल केवळ कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.
आर्मीसाठी सर्वोच्च योगदान देण्याचा प्रयत्न
स्वप्न पहायची असतील तर ती मोठी पहा आणि ती सत्यात उतरायची असतील तर प्रामाणिकपणे, जिद्दीने, मोठय़ा निर्धाराने निरंतर प्रयत्न करा. यश आपोआपच तुमच्या पायाशी लोळण घेईल. मी माझ्या आयुष्यात कुठल्याच पदासाठी काम केलं नाही. देशासाठी, आर्मीसाठी सर्वोच्च योगदान देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. त्याचे फळ या नव्या जबाबदारीच्या रुपाने मला प्राप्त झाल्याचे प्रतिपादन भारतीय स्थलसेनेचे नवनियुक्त लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले.
बेळगावात प्राथमिक शिक्षण
लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस यांचे मूळ गाव डोंगरपाल असले तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव येथील सेंट झेवियर स्कूल येथे आणि माध्यमिक शिक्षण बेळगाव राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एनडीएत प्रवेश करून तद्नंतर 1985 मध्ये ते अधिकारी म्हणून भारतीय आर्मीत रुजू झाले. त्यांची ‘कोअर ऑफ सिग्नल’ मध्ये निवड झाली आणि तेथूनच त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर यशाच्या एक-एक पायऱया चढत, त्यांनी लेफ्टनंट जनरल पदापर्यंत झेप घेतली. गवस हे सिग्नल ऑफ कोअरमध्ये असले तरी ते उत्कृष्ट पॅराट्रुपर आहेत. 24 पॅराब्रिगेड सिग्नलचे ते सदस्यही राहिले आहेत. अत्युच्च प्रकारच्या एअर वॉरफेअरसाठी विविध देशांमध्ये जाऊन विशेष प्रशिक्षण घेण्याकरिता भारतीय सेनादलाने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील एकूण 24 सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकाऱयांची निवड केली होती. त्यामध्ये लेफ्टनंट जनरल गवस यांचा सामावेश होता. भारतीय सैन्यदलातील अत्यंत मानाचे म्हणून ओळखले जाणारे हायर एअर कमांडर कोर्स, नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स, हय़ूमन रिसोर्सेस आणि डिव्हीजन कमांडंट हे कोर्स त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेत. तब्बल 10 देशांमध्ये आर्मीच्यावतीने त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
गवस यांच्या मातोश्रींची बेळगावात शिक्षिका म्हणून सेवा
कुलभूषण गवस यांच्या पत्नी या देखील देवगडच्या. शिरगावचे सुपुत्र डॉ. नारायण साटम यांच्या त्या सुकन्या. गवस यांचा एक भाऊ इंजिनिअर असून तो बेळगावला असतो. सिंधुदुर्गातील ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती मोडक व रत्नागिरी जिल्हय़ातील लांजा येथील माजी जि. प. सदस्या लतीका पाटील या त्यांच्या भगीनी होत. गवस यांच्या मातोश्रींनी बेळगांव म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिक्षिका म्हणून सेवा दिली आहे. लेफ्टनंट जनरल गवस यांच्याकडे आता नवी जबाबदारी देण्यात आली असून ते आता मध्यप्रदेश येथील इंदौर नजिकच्या महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे चिफ कमांडंट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.