दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळा प्रकरणात चौकशीच्या फेऱयात अडकू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय टीम डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करत असल्यामुळे भविष्यात केजरीवाल सरकारची डोकेदुखी वाढू शकते. मनीष सिसोदिया यांची रिमांडमध्ये चौकशी केल्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सीबीआय-ईडी कार्यालयात बोलावले जाऊ शकते. याप्रकरणी तपास पथकाला सबळ पुरावे सापडल्याची माहिती समोर येत आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगात जाऊन चौकशी केली आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱयाने सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्या घरी आपल्याला बोलावले होते, असा दावा या घोटाळय़ातील चौकशीदरम्यान सीबीआयसमोर केला आहे. याप्रसंगी सत्येंद्र जैनही तेथे होते. या महत्त्वाच्या चर्चेदरम्यान सिसोदिया यांनी आपल्याला मद्य व्यावसायिकांचे कमिशन वाढवण्यासाठी मसुदा तयार करण्यास सांगितले होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱयाने सीबीआयला दिली आहे. अधिकाऱयाच्या या माहितीमुळे सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया यांच्यापाठोपाठ आता अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.