प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
देशात बहुचर्चित ठरलेली एअर टॅक्सीची सुविधा आता बेळगाव विमानतळावरही उपलब्ध होणार आहे. एअर टॅक्सी या कंपनीने बेळगावमधून व्यवसाय सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने यापुढील काळात रस्त्यावरील टॅक्सी सेवेप्रमाणेच एअर टॅक्सी सुविधा मिळणार आहे. त्यामुळे बेळगावमधील प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
हरियाणा येथील एअर टॅक्सी या कंपनीने बेळगावमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीने एका सोशल नेटवर्किंग साईटवर कर्मचारी भरतीसाठी जाहिरातही केली आहे. बेळगावमधील व्यवसाय फायदेशीर असल्यामुळे कंपनी येथून सेवा देण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. उडान अंतर्गत देशातील 32 मार्गांवर एअर टॅक्सी सुविधा सध्या कार्यरत आहे.
जवळच्या मार्गांवर रस्त्यावरील टॅक्सीप्रमाणे ही कंपनी सेवा देते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने बेळगाव विमानतळ प्रशासनाला पत्र लिहून हँगर उभा करण्याबद्दल विचारणा केली होती. विमानतळावर उपलब्ध जागेची पाहणीही करण्यात आली होती. टी 2006 टी-एटीएस हे एअरक्राफ्ट सेवा देणार आहे. एकावेळी चार प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता या एअरक्राफ्टमध्ये असणार आहे. बेळगावमध्ये केएलई, एकस यासारखे हॉस्पिटल व उद्योग असल्यामुळे या सेवेचा उपयोग होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.