वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा फोंडय़ासह परिसरात पुरेशी वीज मिळणार
वार्ताहर /मडकई
फर्मागुडीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने 1 मेगा वॅट सौर उर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पामुळे फर्मागुडीतील विविध शैक्षणिक आस्थापनांना, फोंडय़ातील ग्राहकांना व फोंडय़ाच्या आसपासच्या भागात पुरेशी वीज मिळेल, अशी घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सोमवारी फर्मागुडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
ग्राहकांना केंद्रबिंदू ठेवून वीज खात्याला योग्य न्याय देताना योग्य व आवश्यक बदल घडवून आणले जाईल, असेही ते म्हणाले. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम, आवश्यक त्या ठिकाणी वीज केंद्रे व उपकेंद्रांचे काम हाती घेतले जाईल.
वीज चोरटय़ांवर तात्काळ करवाई करणार
वीज ग्राहकाला फसवण्याचे प्रकार अनेकठिकाणी वारंवार घडत असतात. अवैध मार्गाने काही भूरटे व्यवसायिक आस्थापनांना अतिरिक्त वीज पुरवितात. अशा प्रकारांना तात्काळ आळा घातला जाईल. कुणाच्याही नजरेस असे प्रकार आढळून आल्यास आपल्या दृष्टीपथास आणून द्यावे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ढवळीकर यांनी दिला आहे.
राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय लाईनमन दिन
वीज लाईनमनच्या सुरक्षेसाठी 15 ते 25 लाखपर्यंत विमा योजना आखली आहे. त्यांना बुट, लाकडी शिडी, ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारी ऑईल, अशा अ्नावश्यक असलेल्या सर्व वस्तू व विजसाहित्य पुरविण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पावसाळय़ापूर्वीची कामे हाती घेतलेली आहे. आपल्या कार्यकाळात पहिल्यांदाच राष्ट्रीय लाईनमन दिन सुरु केलेला आहे, अशी माहिती वीजमंत्र्यांनी यावेळी दिली.
अडिच हजार प्रलंबित अर्ज काढले निकाली
आपण वीज खात्याचा ताबा घेतल्यानंतर विजेसंबंधीचे 4900 अर्ज प्रलंबित होते. त्यातील अडीच हजार अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. अतिरिक्त वीज सेवा समस्या दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून कमी वीज दरात वीज खरेदी करून अतिरिक्त वीज समस्या निकाली काढली जाईल. त्यासाठी आपण वीज खात्याच्या अधिकाऱयांशी बैठक घेऊन सविस्तर चर्चाही केली आहे. त्यानुसार सुमारे 5 हजार कोटी रुपयांची वीज खात्याशी संबंधित भूमिगतवीज वाहिनी व इतर साहित्य खरेदीसाठी प्रस्ताव तयार करून तो वित्तीय मंजूरीसाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे पाठवून दिल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
ग्राहकांना भुर्दंड पडणार नाही, यासाठी प्रयत्नरत
विजेच्या दरात युनिटमागे किमान पाच ते दहा पैसे दरवाढ अपेक्षित आहे. वीज महामंडळाच्या रेग्युलेटरी बोर्डाने ही दरवाढीची शिफारस सहा महिन्यांपूर्वी केली होती. या दरवाढीची अंमलबजावणी आता टप्याटप्याने केली जाईल. अन्यथा भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पासाठीच्या विनियोगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्राहकांना दरवाढीतून आर्थिक भुर्दंड पडणार नाही, यासाठीही आपले प्रयत्न आहेत, असेही वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.