झारखंडमध्ये घडामोडींना वेग ः संपुआ आमदारांची बोलाविली बैठक
वृत्तसंस्था / रांची
झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचे कनिष्ठ बंधू वसंत सोरेन यांच्या विरोधातील सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जनप्रतिनिधित्व अधिनियमाचे कलम 9 च्या उल्लंघनाप्रकरणी त्यांच्याविरोधात ही सुनावणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाकडून आता याप्रकरणी कुठल्याही दिवशी निर्णय दिला जाऊ शकतो तसेच राज्यपालांना संबंधित नियमाच्या अंमलबजावणीची शिफारस केली जाऊ शकते. याचमुळे राज्यातील राजकारण तापू लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या संभाव्य निर्णयानंतर उद्भवणाऱया राजकीय स्थितीला सामोरे जाण्यासाठी हेमंत सोरेन यांचे सरकार पूर्णपणे दक्ष आहे. वेगाने बदलणाऱया राजकीय घडामोडींदरम्यान विधानसभा अध्यक्ष रविंद्रनाथ महतो आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार निरल पूर्ति यांनी कॅनडाचा दौरा स्थगित केला आहे. तर विरोधी पक्ष भाजपचे आमदार डॉ. लंबोदर महतो हे एका बैठकीसाठी कॅनडामध्ये जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 20 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी रांची येथील स्वतःच्या शासकीय निवासस्थानात संपुआच्या सर्व आमदारांची बैठक बोलाविली आहे. झामुमोचे प्रतोद आणि टुंडी मतदारसंघाचे आमदार मथुरा प्रसाद महतो यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 11 वाजता संपुआच्या सर्व आमदारांना पोहोचण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत झामुमो तसेच राजद आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आमदारांना निर्देश
दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगीर आलम यांनी बुधवारी रांची येथे पार पडलेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांना रांची येथे राहण्याचा निर्देश दिला आहे. या आमदारांना झारखंडच्या बाहेर न जाण्याचा निर्देश देण्यात आला आहे. तसेच तातडीच्या निरोपानंतर 4 तासांमध्ये रांचीमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपकडून टीका
याचदरम्यान गोड्डाचे भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी राज्यातील सत्तारुढ आघाडीवर टीका केली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस दिल्ली-रांची अशी का पळापळ करत आहेत. बरहेट आणि दुमका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असे म्हटल्यावर मला वेडय़ात काढण्यात आले होते. आता तर विधानसभा अध्यक्षांना कॅनडा येथे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. सोरेन यांच्याकडे केवळ राजीनामा हाच एक पर्याय असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.