हेन्रीच क्लासेनचे धडाकेबाज अर्धशतक, बवुमा-मिलरचे उपयुक्त योगदान, भुवनेश्वर कुमारचे प्रयत्न वाया
वृत्तसंस्था/ कटक
गोलंदाजांचा अचूक मारा आणि सामनावीर हेन्रीच क्लासेनच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा दुसऱया टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 गडय़ांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळविली.
दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजी देत 20 षटकांत 6 बाद 148 अशा माफक धावसंख्येवर रोखले. इशान किशन, श्रेयस अय्यर व दिनेश कार्तिक यांनी तिशी पार करण्यात यश मिळविले. त्यानंतर 18.2 षटकांत 6 बाद 149 धावा जमवित द.आफ्रिकेने विजय साकार केला. क्लासेनने या विजयात मोलाचा वाटा उचलला. इतर फलंदाज झगडत असताना त्याने 46 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी करीत 81 धावा झोडपल्या. विजयासाठी 5 धावांची गरज असताना तो बाद झाला. याशिवाय सलामीवीर व कर्णधार तेम्बा बवुमाने 30 चेंडूत 35 आणि मिलरने 15 चेंडूत नाबाद 20 धावा जमविल्या. भुवनेश्वर कुमारने 13 धावांत 4 बळी मिळविले. पण इतरांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
भारताला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर श्रेयस अय्यरने भारतातर्फे सर्वाधिक 40 धावांचे योगदान दिले तर इशान किशनने सुरुवातीला फटकेबाजी करीत 21 चेंडूत 34 धावा काढल्या. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी केली. फलंदाजीस अनुकूल नसलेल्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावांसाठी झगडावे लागले. यजमान संघाला मधल्या षटकांत द.आफ्रिकेच्या अचूक माऱयामुळे जलद धावा करता आल्या नाहीत. याशिवाय फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकला अक्षर पटेलनंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. त्याचाही भारताला फटका बसला. त्याने 21 चेंडूत 2 षटकार, 2 चौकारांसह नाबाद 30 धावा जमविल्या. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताला दीडशेच्या जवळपास मजल मारता आली. अखेरच्या टप्प्यात हर्षल पटेलने 9 चेंडूत नाबाद 12 धावा जमवित त्याला चांगली साथ दिली. दोघांनी धावगती वाढवत शेवटच्या तीन षटकांत 36 धावांची भर टाकली.
भारताची खराब सुरुवात
रबाडाने पहिल्याच षटकात द.आफ्रिकेला यश मिळवून देताना ऋतुराज गायकवाडला (1) बाद केले.
त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करीत मध्येच फुलर लेंग्थ चेंडू टाकत त्याला चकविले. रबाडाने या सामन्यात किफायतशीर मारा करीत 4 षटकांत केवळ 15 धावा देत 1 बळी मिळविताना 13 निर्धाव चेंडू टाकले. प्रारंभीच धक्का बसला असला तरी इशान व श्रेयस यांनी पॉवरप्लेचा चांगला उपयोग करून घेत फटकेबाजी केली. इशानने नॉर्त्जेला दोन षटकार ठोकत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात इशानने अर्धशतक नोंदवले होते. तोच फॉर्म त्याने येथे पुढे सुरू ठेवला. पिकअप फटक्यावर जास्त भर देत त्याने आपल्या खेळीत स्क्वेअरलेग क्षेत्रात तीन षटकार व दोन चौकार मारले. ही जोडी बहरणार असे वाटत असतानाच नॉर्त्जेने इशानला उसळत्या चेंडूवर बाद केले. त्याने केलेला हुक डीप स्क्वेअरलेगवरील व्हान डेर डय़ुसेनच्या हातात गेला. कर्णधार रिषभ पंत (5), हार्दिक पंडय़ा (9), अक्षर पटेल (10) यांना मोठे योगदान देता आले नाही. द.आफ्रिकेच्या नॉर्त्जेने 36 धावांत दोन तर रबाडा, पार्नेल, प्रिटोरियस, केशव महाराज यांनी एकेक बळी मिळविला. केशवने दोन षटकांत केवळ 12 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 6 बाद 148 ः गायकवाड 1, इशान किशन 34 (21 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), श्रेयस अय्यर 40 (35 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रिषभ पंत 7 चेंडूत 5, हार्दिक पंडय़ा 12 चेंडूत 9, अक्षर पटेल 11 चेंडूत 10, दिनेश कार्तिक नाबाद 30 (21 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), हर्षल पटेल नाबाद 12 (9 चेंडूत 2 चौकार), अवांतर 7. गोलंदाजी ः ऍन्रिच नॉर्त्जे 2-36, केशव महाराज 1-12, प्रिटोरियस 1-40, पार्नेल 1-23, रबाडा 1-15.
दक्षिण आफ्रिका 18.2 षटकांत 6 बाद 149 ः बवुमा 35 (30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), हेन्ड्रिक्स व प्रिटोरियस प्रत्येकी 4, डय़ुसेन 1, क्लासेन 81 (46 चेंडूत 7 चौकार, 5 षटकार), मिलर नाबाद 20 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पार्नेल 1, अवांतर 3. गोलंदाजी ः भुवनेश्वर 4-13, चहल 1-49, हर्शल पटेल 1-17, हार्दिक 0-31.