सामनावीर रॉस्यूचे नाबाद शतक, प्रेटोरियसचे 3 बळी, सूर्यकुमार मालिकावीर
इंदोर / वृत्तसंस्था
डावखुरा फलंदाज रिली रॉस्यूचे नाबाद शतक, डी कॉकचे अर्धशतक आणि गोलंदाजांचा भेदक मारा यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान भारताचा 49 धावांनी पराभव केला. मालिका मात्र भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली. रॉस्यूला सामनावीर तर सूर्यकुमार यादवला मालिकावीराचा बहुमान मिळाला. आता उभय संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून यातील पहिला सामना लखनौमध्ये गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
डावखुऱया रिली रॉस्यूने 48 चेंडूत नाबाद 100 धावा फटकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने या लढतीत 3 बाद 227 धावांचा डोंगर रचला. टी-20 वर्ल्डकप संघात समाविष्ट जलद गोलंदाज हर्षल पटेल (0-49) या सामन्यात महागडा ठरला. शिवाय, दीपक चहर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांनी देखील षटकामागे 11 पेक्षा अधिक सरासरीने धावा मोजल्या. रॉस्यू व क्विन्टॉन यांनी 48 चेंडूत 90 धावांची आतषबाजी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भेदक मारा करीत भारताचा डाव 18.3 षटकांत 178 धावांत गुंडाळून 49 धावांनी विजय मिळविला. भारताच्या डावात प्रारंभापासूनच गळती लागली. कर्णधार रोहित शून्यावर, श्रेयस अय्यर 1, सूर्यकुमार यादव 8, अक्षर पटेल 9 धावा काढून बाद झाल्यानंतर भारताची स्थिती 8 षटकाअखेर 5 बाद 86 अशी झाली होती. प्रारंभीच्या धक्क्यातून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही. फक्त दिनेश कार्तिकने जोरदार फटकेबाजी करीत 14 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 46 धावा झोडपल्या. तो बाद झाल्यानंतर दीपक चहर (17 चेंडूत 31) व उमेश यादव (17 चेंडूत नाबाद 20) यांनी थोडीफार फटकेबाजी करीत नवव्या गडय़ासाठी 48 धावांची भर घातली. याशिवाय पंने 14 चेंडूत 27, हर्षल पटेलने 17 धावा केल्या. प्रेटोरियला उत्तुंग फटका मारताना चहर झेलबाद झाला. आणखी दहा धावांची भर घातल्यानंतर सिराजही बाद झाल्याने 178 धावांत भारताचा डाव संपुष्टात आला. प्रेटोरियसने 26 धावांत 3, पार्नेल, एन्गिडी, केशव महाराज यांनी प्रत्येकी 2, रबाडाने रोहित शर्माचा एकमेव बळी मिळविला.
रॉस्यू-डी कॉकची फटकेबाजी
प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने डी कॉक व रॉस्यूच्या आक्रमक फटकेबाजीमुळे 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 48 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार तेम्बा बवूमा सलग तिसऱयांदा स्वस्तात बाद झाला. पहिल्या दोन सामन्यात खातेही उघडता आले नव्हते, याचे दडपण त्याच्या खेळीत सातत्याने जाणवत राहिले. नंतर त्याने उमेश यादवच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिडऑफकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला.
गुवाहाटीत धावांसाठी झगडावे लागलेल्या डी कॉकने येथे 43 चेंडूत 68 धावांची आतषबाजी केली. रॉस्यूने 48 चेंडूत 7 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 100 धावा झोडपल्या. दोन्ही डावखुरे फलंदाज तुटून पडत राहिल्याने रोहितने अक्षर पटेलला 14 व्या षटकापर्यंत रोखले. नवव्या षटकात अश्विनला दोन षटकारासाठी पिटाळून लावले गेले. डी कॉकचा रिव्हर्स स्वीप व रॉस्यूचा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील स्वीपचा षटकार लक्षवेधी ठरला होता. रॉस्यूने छोटय़ा मैदानाचा लाभ उठवत तब्बल आठ षटकार ठोकले.
16 व्या षटकावेळी नॉनस्ट्रायकरवरील स्टब्स क्रीझ सोडून पुढे जात असल्याचे पाहून चहरने गमतीने त्याला धावचीत न करता एक प्रकारे हलका इशारा दिला. डावातील शेवटच्या षटकात मिलरने चहरचा फुलटॉस मैदानाबाहेर भिरकावून दिल्यानंतर आणखी दोन षटकार मारले. या षटकांत द.आफ्रिकेने 24 धावा वसूल केल्या. भारतातर्फे उमेश यादव व दीपक चहर यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ः 20 षटकात 3 बाद 227 (रिली रॉस्यू 48 चेंडूत 7 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 100, क्विन्टॉन डी कॉक 43 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 68, ट्रिस्टॅन स्टब्ज 18 चेंडूत 23, डेव्हिड मिलर 5 चेंडूत नाबाद 19. अवांतर 14. दीपक चहर, उमेश यादव प्रत्येकी 1 बळी).
भारत ः 18.3 षटकांत सर्व बाद 178 ः पंत 14 चेंडूत 27, कार्तिक 21 चेंडूत 46, हर्षल पटेल 12 चेंडूत 17, चहर 17 चेंडूत 31, उमेश यादव नाबाद 20, अवांतर 12. प्रेटोरियस 3-26, केशव महाराज 2-34, पार्नेल 2-41, एन्गिडी 2-51.