द.आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमानांचा एकतर्फी धुव्वा
वृत्तसंस्था/ लॉर्ड्स
अडीच दिवसांत संपलेल्या पहिल्या कसोटी दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडचा तब्बल एक डाव 12 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. सामन्यात 7 बळी टिपणाऱया रबाडाला सामनावीराचा बहुमान मिळाला.
या कसोटीच्या दुसऱया दिवशी इंग्लंडचा डाव रबाडा, नॉर्त्जे व जॅन्सन यांच्या भेदक माऱयासमोर 45 षटकांत केवळ 165 धावांत आटोपला. फक्त ऑली पोपने अर्धशतकी खेळी करताना 102 चेंडूत 73 धावा जमविल्या. अन्य फलंदाजांना वीसच्या पुढे मजल मारता आली नाही. बेन स्टोक्सने 30 चेंडूत 20, स्टुअर्ट ब्रॉडने 20 चेंडूत 15, जॅक लीचनेही 17 चेंडूत 15 धावा जमविल्या. यांच्याव्यतिरिक्त इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. रबाडा द.आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 52 धावांत 5 गडी बाद केले तर नॉर्त्जेने 63 धावांत 3 व जॅन्सेनने 30 धावांत 2 बळी टिपले. एन्गिडीने पाच षटके टाकली, त्याला 12 धावांत एकही बळी मिळविता आला नाही.
त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव रबाडा, नॉर्त्जे, जॅन्सेन व केशव महाराज यांच्या भेदक माऱयापुढे 37.4 षटकांत केवळ 149 धावांत आटोपल्याने द.आफ्रिकेला एक डाव 12 धावांनी विजय मिळविला. लॉर्ड्सवर डावाने पराभूत होण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 2003 मध्ये त्यांना या मैदानावर डावाने पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱया डावात लीसने 35, क्राऊलीने 13, बेअरस्टोने 18, स्टोक्सने 20, ब्रॉडने 29 चेंडूत 35 धावा जमविल्या. या डावात नॉर्त्जेने 3, रबाडा, केशव महाराज, जॅन्सेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
द.आफ्रिकेने त्यानंतर पहिल्या डावात दुसऱया दिवशीअखेर 7 बाद 289 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळास द.आफ्रिकेने पुढे प्रारंभ केला आणि उर्वरित फलंदाजांनी आणखी 37 धावांची भर घातली. वैयक्तिक सहाव्या कसोटीत खेळणारा 22 वर्षीय जलद गोलंदाज जॅन्सेन 48 धावांवर बाद झाला. आदल्या दिवशीच्या धावसंख्येत त्याने 7 धावांची भर घातली असली तरी इंग्लंडला तासभर त्याने मैदानात ठेवले होते. त्याने नॉर्त्जेसमवेत नवव्या गडय़ासाठी 29 धावांची भर घातली. ब्रॉडने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले.
त्याआधी रबाडा दिवसातील तिसऱया चेंडूवर बाद झाला. ब्रॉडने अप्रतिम झेल घेत त्याला माघारी पाठवले. त्यानंतर एन्गिडी शून्यावर बाद झाला आणि नॉर्त्जे 42 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी डीन एल्गारने 47, सॅरेल एर्वीने 73, कीगन पीटरसनने 24, मॅरक्रमने 16, रासी व्हान डर डय़ुसेनने 19, व्हेरेयेनने 11, केशव महाराजने 49 चेंडूत 41 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड व स्टोक्स यांनी प्रत्येकी 3, मॅथ्यू पॉट्सने 2 व अँडरसन, जॅक लीच यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प.डाव 45 षटकांत सर्व बाद 165 ः पोप 102 चेंडूत 73, स्टोक्स 30 चेंडूत 20, ब्रॉड 20 चेंडूत 15, लीच 17 चेंडूत 15, अवांतर 8. गोलंदाजी ः रबाडा 5-52, नॉर्त्जे 3-63, जॅन्सेन 2-30. द.आफ्रिका प.डाव 89.1 षटकांत सर्व बाद 326 ः एर्वी 146 चेंडूत 73, जॅन्सेन 79 चेंडूत 48, केशव महाराज 49 चेंडूत 7 चौकारांसह 41, नॉर्त्जे नाबाद 28, पीटरसन 24, मॅरक्रम 16, डय़ुसेन 19, व्हेरेयेन 11, अवांतर 16. गोलंदाजी ः ब्रॉड 3-71, स्टोक्स 3-71, पॉट्स 2-79, अँडरसन 1-51, लीच 1-42. इंग्लंड दु.डाव 37.4 षटकांत सर्व बाद 149 ः लीस 35, ब्रॉड 35, स्टोक्स 20, बेअरस्टो 18, अवांतर 15. गोलंदाजी केशव महाराज 2-35, नॉर्त्जे 3-47, रबाडा 2-27, जॅन्सेन 2-13, एन्गिडी 1-15.