वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या दहाव्या सुलतान जोहोर चषक कनिष्ठ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे शारदानंद तिवारी, कर्णधार उत्तम सिंग, सुदीप चिमको यांनी गोल केले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मेर्विन सिमन्स, फवाझ कादिर, निगुबेन आणि कॅमेरून फॉरेस्टर यांनी गोल नेंदविले. हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. दक्षिण आफ्रिकेने सातव्या मिनिटाला आपले खाते सिमन्सच्या गोलवर उघडले. त्यानंतर भारताच्या शारदानंद तिवारीने दोन मिनिटांच्या कालावधीत दोन गोल नोंदवून आपल्या संघाला आघाडीवर नेले. तिवारीने पहिला गोल 9 व्या मिनिटाला तर दुसरा गोल 10 व्या मिनिटाला केला. कर्णधार उत्तम सिंगने 17 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल नोंदविला. सामन्यातील पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. शारदानंद तिवारीने आपले दोन्ही गोल पाठोपाठ मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. मध्यंतरापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 3-1 अशी बढत मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. 34 व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोल फवाझ कादिरने नोंदविला. त्यानंतर केवळ एक मिनिटाच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेने तिसरा गोल नेगुबेनद्वारे नोंदविला. द. आफ्रिकेने भारताशी 3-3 अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेचा आघाडीफळीतील हॉकीपटू फॉरेस्टरने 49 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवित भारताचे आव्हान 5-4 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा 5-1 असा पराभव केला होता. आता भारताचा या स्पर्धेतील तिसरा सामना जपानबरोबर मंगळवारी होत आहे.