वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात कृष्णन बहाद्दूर पाठकच्या भक्कम गोलरक्षणाच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.
या सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. हरमनप्रित सिंगने 12 व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी स्पेनवर मिळविली होती. हरमनप्रितचा हा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला गेला. 32 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने भारताचा आणि वैयक्तिक दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवरच केला. मध्यंतरापर्यंत भारताने स्पेनवर 2-0 अशी बढत मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर स्पेनने आपली आक्रमणे तीव्र करत भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. 43 व्या मिनिटाला मार्क मिरालेसने स्पेनचे खाते उघडले. 55 व्या मिनिटाला पेरी अमातने स्पेनचा दुसरा गोल करून भारताशी बरोबरी केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. या सामन्यामध्ये पहिल्या चार मिनिटातच स्पेनने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला होता. पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. 10 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण जुगराज सिंगचा फटका गोलपोस्टच्या बऱयाच बाहेरून गेला. 12 व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रित सिंगने त्याचा लाभ उठविला. 25 व्या मिनिटाला मनप्रितसिंगला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही. सामन्याच्या उत्तरार्धात भारताचा गोलरक्षक कृष्णन बहाद्दूर पाठकने स्पेनची दोन आक्रमणे थोपविली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे हरमनप्रित सिंग, राजकुमार पाल आणि अभिषेक यांनी गोल नोंदविले. स्पेनतर्फे गेरार्ड क्लेप्सने गोल केला. तर गोलरक्षक पाठकने स्पेनच्या मिनेनी, राफेल, व्हिलाल ओंगा आणि मिरालेस यांचे फटके अचूकपणे थोपविल्याने स्पेनचे या सामन्यातील आव्हान संपुष्टात आले. भारतीय हॉकी संघाला या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यात स्पेनकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत रविवारच्या सामन्यातील विजयानंतर भारताने गुणतक्त्यात चार सामन्यातून 8 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.