वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेन फुटबॉल संघातील हुकमी फुटबॉलपटू सर्जिओ बसक्वेट्सने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. बसक्वेट्सने आपल्या वैयक्तिक जवळपास 10 वर्षांच्या फुटबॉल कारर्किदीत स्पेन संघातील मध्यफळी सांभाळली होती. 2010 साली फिफाची विश्वकरंडक स्पर्धा जिंकणाऱया स्पेन संघामध्ये बसक्वेट्सचा समावेश होता.
34 वर्षीय बसक्वेट्सने स्पेनला 2012 साली युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती. त्याने 143 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पेनचे प्रतिनिधीत्व केले आहे. स्पेन फुटबॉल संघाकडून आतापर्यंत सर्जिओ रॅमोसने सर्वाधिक म्हणजे 180 सामने तर इकेर कॅसिलासने 167 सामने खेळले आहेत. बसक्वेट्सच्या कामगिरीचे स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष रुबिलेस यांनी खास कौतुक केले असून त्याला भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या. बसक्वेट्सने बार्सिलोना फुटबॉल क्लब बरोबर यापूर्वी केलेला करार चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामाअखेर संपणार आहे.