तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना सल्ला : काली माहितीपटाच्या दिग्दर्शिकेकडून आणखी एक वादग्रस्त पोस्टर
वृत्तसंस्था /कोलकाता
काली या माहितीपटाच्या पोस्टरवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना वादग्रस्त विधानाप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सल्ला दिला आहे. सार्वजनिक जीवनात आम्हाला लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो. अशा स्थितीत अत्यंत विचारपूर्वक एखादे वक्तव्य केले जावे. कामकाजादरम्यान अनेकदा चुका घडतात, परंतु नकारात्मक मुद्दय़ांकडे लक्ष दिले जाऊ नये असे ममतांनी म्हटले आहे.
याचदरम्यान माहितीपटाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांनी सोशल मीडियावर आणखी एक वादग्रस्त पोस्टर शेअर केले आहे. गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती यांना धूम्रपान करताना दर्शविण्यात आले आहे.
लीना यांच्या या नव्या सोशल मीडिया पोस्टवर भाजप नेते तसेच अन्य युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. लीना यांनी भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. तर लोकांचा संताप पाहता लीना यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. देश सर्वात मोठय़ा लोकशाहीपासून हेट मशीन ठरला आहे. लोक मला सेन्सॉर करू पाहत आहेत. सध्या मला कुठेच सुरक्षित वाटत नसल्याचा दावा लीना यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
हे ट्रोल माझ्या कलात्मक स्वातंत्र्याच्या मागे पडले आहेत. मी अशा बुद्धीहीन उजव्या विचारसरणीच्या गुंडांना घाबरून स्वतःचे स्वातंत्र्य सोडून दिले तर इतरांचेही स्वातंत्र्य हिरावले जाईल, असा दावा लीना यांनी केला आहे.
संयमाची परीक्षा घेऊ नका
लीना यांच्या या ट्विटवर आसनसोलमधील भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी टिप्पणी केली आहे. लीना यांनी शेअर केलेले पोस्टर धार्मिक भावना भडकाविणारे आहे. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. आमच्या सहनशीलतेला दुबळेपणा मानू नका, असे पॉल यांनी म्हटले आहे.
काली पोस्टरवरून वाद
लीना मणिमेकलाई यांच्या माहितीपटाच्या पोस्टरवरून 2 जुलैपासून वाद सुरू आहे. लीना यांनी कॅनडाच्या टोरंटोमध्ये या माहितीपटाचे प्रदर्शन केले होते. यात कालीमातेच्या भूमिकेतील अभिनेत्रीला धूम्रपान करताना दाखविण्यात आले होते. पोस्टरमध्ये कालीमातेच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱया हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दाखविण्यात आला आहे. या पोस्टरमुळे सोशल मीडियावर लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय. अनेक युजर्सनी लीना यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
4 राज्यांमध्ये एफआयआर
लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात काली पोस्टरवरून आतापर्यंत दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहारमध्ये एफआयआर नोंद झाला आहे. यामुळे लीना यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तर तामिळनाडूच्या सरकारने कारवाईचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचे म्हणत स्वतःचे अंग झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.