महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी यांची विभागीय कार्यालयांना भेट : कामाची केली पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमधील सर्व मालमत्तांची नोंद ‘ई-अस्ती’ या संगणकीय प्रणालीवर करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. मात्र ‘ई-अस्ती’ या संगणकीय प्रणालीवर मालमत्तांची नोंद करण्यामध्ये महापालिका पिछाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इ-अस्ती नोंदीच्या फाईल निकालात काढण्यासाठी रविवारी सुटीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात आली.
ई-अस्ती या प्रणालीवर मालमत्तेचा तपशील, मालमत्ताधारकांचे छायाचित्र आणि इमारतीचे छायाचित्र अशी विविध माहिती नोंद करणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. शहरातील असंख्य मालमत्ताधारकांनी ई-अस्ती नोंदीसाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. पण महापालिकेकडून नोंद करण्यात आली नाही. यापूर्वीच्या महसूल उपायुक्तांनी याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी ई-अस्तीच्या असंख्य फाईल प्रलंबित आहेत. प्रत्येक मालमत्तेची नोंद ई-अस्ती प्रणालीवर करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. त्यामुळे प्रलंबित फाईल निकालात काढण्यासह मालमत्तांची नोंद ई-अस्ती प्रणालीवर करण्यासाठी महापालिकेच्या महसूल विभागाने विशेष मोहीम राबविली आहे.
रविवारी सुटीच्या दिवशी देखील हे काम हाती घेण्यात आले होते. महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयात ई-अस्ती नोंदणीचे काम हाती घेण्यात आले होते. महसूल निरीक्षकांसह वॉर्ड क्लार्क आणि संगणक ऑपरेटर रविवारी कार्यालयात हजर होते.
यावेळी महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी यांनी अशोकनगर, गोवावेस, मनपा जुने कार्यालय, कोनवाळ गल्ली अशा मनपाच्या विविध कार्यालयात भेट देऊन कामाची माहिती घेतली.