मान्सूनपूर्व कामांसंबंधी चर्चा, निर्णय होणार
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील सर्व 25 प्रभागांतील मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक आज बुधवारी बोलाविण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी दिली आहे. प्रभागवार नाले, गटारांची साफसफाई तसेच आवश्यक ठिकाणी झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्याच्या सूचना या बैठकीत नगरसेवकांकडून होण्याची शक्मयता आहे.
कित्येक प्रभागांत रस्त्यांच्या कडेला गवत उगवल्याचे दिसून येत असून शहरी भागातही हे प्रकार दिसून येतात. पालिकेच्या कामगारांकडून अलीकडच्या काळात अशा प्रकारचे गवत व झाडे-झुडपे कापण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. पालिकेचे कायमचे तसेच रोजंदारीवरील कामगार वापरून प्रभागवार दर महिन्याला कामगार पुरविण्यात येत असतात. मात्र पूर्वीप्रमाणे ही कामे सुलभपणे होताना दिसत नाहीत. पालिकेचे पर्यवेक्षक कामगारांकडून साफसफाईची कामे करून घेण्यात कमी पडत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे जागोजागी रस्त्यांच्या बाजूने गवत वाढण्याचे प्रकार अलीकडे नित्याचेच बनले आहेत. नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारण्याची गरज मडगाववासियांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्व साफसफाईची कामे करण्यासाठी पालिकेकडून 21 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 15 लाख पालिका संचालनालयाकडून, तर 6 लाख 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून वापरण्यात येणार असल्याचे बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.