विनाहेल्मेट, ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी सायंकाळी घरी जाण्याच्या मूडमध्ये असलेल्या दुचाकीस्वारांना बेळगाव पोलिसांनी धक्का दिला. वाहतूक पोलिसांबरोबरच नागरी पोलिसांनीही वाहने अडवून तपासणीची मोहीम सुरू केली. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. रात्रीपर्यंत 900 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
वाहतूक उत्तर व दक्षिण विभाग पोलिसांकडून नियमितपणे वेगवेगळय़ा ठिकाणी मोटारसायकली, कार व वेगवेगळी वाहने अडवून तपासणी करण्याची मोहीम रोजच सुरू असते. नियम मोडणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शनिवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या सूचनेवरून बहुतेक पोलीस अधिकाऱयांनी या मोहिमेत भाग घेतला.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात आली. अडीच ते तीन तासांत सुमारे 900 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधूनमधून सर्व अधिकारी व पोलिसांना सोबत घेऊन अशी मोहीम राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, कागदपत्रे न बाळगणे, दोषयुक्त नंबरप्लेट लावणे, आदींबरोबरच शनिवारी खासकरून ट्रिपल सीट वाहने चालविणाऱयांवर कारवाई करण्यात आली. अनेक जण कागदपत्रे आपल्या जवळ ठेवत नाहीत. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वाहतूक पोलिसांचीही नजर असते. तरीही विनाहेल्मेट दुचाकी चालविण्यात येते.
ट्रिपलसीटमुळे अनेकवेळा अपघात घडतात. यासंबंधी जागृती करण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. या मोहिमेत वाहतूक व नागरी पोलीस दलातील बहुतेक अधिकाऱयांनी भाग घेतला. वाहने अडवून तपासणी अधिकाऱयांना पाहून अनेकांनी रस्त्याच्या मधूनच आपले मार्ग बदलले.