बेळगाव ते लोंढा मार्गावर तपासणी : विद्युत इंजिनवर लवकरच रेल्वे धावणार
बेळगाव ; रेल्वेची गती वाढविण्याबरोबरच प्रदूषण टाळण्यासाठी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. बेळगाव ते लोंढा यादरम्यान बऱ्याचशा भागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने मंगळवारी रात्री विद्युत इंजिनच्या साहाय्याने वेग चाचणी घेण्यात आली. यामुळे विद्युत इंजिनवर प्रवासी रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात सर्वत्र रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे. बेंगळूर ते हुबळी यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेससह इतर एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावत आहेत. याच पद्धतीने मिरज ते पुणे या विभागातही विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने बेळगाव ते हुबळी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्युतीकरण झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होणार असून रेल्वेची गती वाढणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास वंदे भारतसारखी एक्स्प्रेस बेळगावला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने युद्धपातळीवर काम सुरू आहे. मंगळवारी रात्री बेळगाव ते लोंढा या मार्गावर विद्युत इंजिनच्या साहाय्याने वेग चाचणी घेण्यात आली. गतीने इंजिन धावताना कोणत्या समस्या येतात का, हे जाणून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आली. यामुळे इलेक्ट्रीक लोकोपायलटचे दर्शन बेळगावकरांना झाले.