ग्राम पंचायत निवडणुकीचा प्रचार समाप्त : अनेक पक्षांचे कार्यकर्ते लढतात समोरासमोर,कुटुंबातील अनेक सदस्य झुंजतात आपसात
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील एकूण 191 पंचायतींपैकी 186 पंचायतींसाठी उद्या बुधवार 10 ऑगस्ट रोजी निवडणूक होत असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. काल सोमवारी सायंकाळी निवडणुकीचा प्रचार संपुष्ठात आला. हे मतदान मतपत्रिकेतून केले जाणार असून शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 12 तालुक्यात विविध ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यादिवशी सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.
निवडणुकीचा प्रचार काल सोमवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर आता उमेदवारांना मतदानाची प्रतीक्षा आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर नसली तरी सत्ताधारी भाजपसह गोवा, काँग्रेस, आप, आरजी अशा विविध राजकीय आमदारांनी आपापले गट त्यात उतरवले असून आमदार, मंत्री यांनी देखील आपापल्या समर्थकांना उभे केले आहेत. शिवाय त्यांनी आपले सगेसोयरे यांनाही रिंगणात उतरवले असून निवडून यावेत म्हणून प्रयत्न चालवले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदारांची परीक्षाच होणार आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत ही निवडणूक घेण्यात येत आहे.
निवडणूक होणाऱया ग्रामपंचायती 186
- उत्तर गोव्यातील ग्रामपंचायती 97
- दक्षिण गोव्यातील ग्रामपंचायती 89
- राज्यातील एकूण प्रभाग 1464
- एकूण मतदान केंद्रे 1517
- एकूण उमेदवार 5038
- बिनविरोध निवडलेले उमेदवार 64
- एकूण मतदार 7,97,020
पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक
निवडणुकीसाठी एकूण 387001 पुरूष मतदार असून 410018 एवढय़ा महिला मतदार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे खरे भवितव्य महिला मतदारांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत महिला उमेदवारही मोठय़ा उत्साहाने रिंगणात उतरल्या असून विविध वॉर्डात बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.
महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ
सर्व तालुक्यातील मतदारांचा विचार केल्यास महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त आहे. महिला मतदार प्रामुख्याने महिला उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता जास्त असल्यामुळे पंचायत निवडणुकीत महिला उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून येण्याची चिन्हे दिसत आहेत. महिलांना राखीव प्रभागही आहेत, आणि खुल्या, पुरुषांच्या प्रभागांमधूनही त्या निवडणूक लढवू शकत असल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.
पंचायत निवडणुकीसाठी किती टक्के मतदान होते व मतदार कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचे ठरणार असून पावसाचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.
पेडणेत 125 प्रभागांसाठी 450 उमेदवार
पेडणे तालुक्यातील 17 पंचायतीतील 125 वॉर्डासाठी मतदान होणार असून त्याकरीता 55895 मतदार मतदान करतील येथे एकूण 125 मतदान केंद्रे आहेत तर 450 उमेदवार रिंगणात आहेत. सत्तरी तालुक्यात 12 पंचायतीमधील 83 वॉर्डासाठी मतदान केले जाणार असून 40623 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील तेथे 83 मतदान केंद्रे असून 259 आखाडय़ात आहेत. डिचोलीतील 17 पंचायतीमधील 114 वॉर्डाकरीता 51262 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. तेथे 114 मतदान केंद्रे असून 380 उमेदवार लढत आहेत.
बार्देशात सर्वाधिक 995 उमेदवार
बार्देशमधील 33 पंचायतीत 266 वॉर्डाकरीता मतदान होणार असून 156303 मतदार 995 उमेदवारांसाठी मतदान करतील तर 280 मतदान केंद्रे आहेत. तिसवाडीतील 18 पंचायतीत 154 वॉर्डात मतदान होणार आहे. एकूण 81784 मतदार 583 उमेदवारांसाठी मतदान करतील तर 163 मतदान केंद्रे सज्ज आहेत. फोंडा तालुक्यात 19 पंचायतीत 166 वॉर्डात मतदान होईल एकूण 116310 मतदार असून 180 मतदान केंद्रे तर 601 उमेदवार आहेत.
सालसेतमध्ये 266 प्रभागांसाठी 863 उमेदवार
सालसेतमधील 33 पंचायतीमधील 266 वॉर्डात 146650 मतदार मतदान करतील तेथे 863 उमेदवार असून 270 मतदान केंद्रे आहेत. सांगेतील 7 पंचायतीमधील 51 वॉर्डात मतदान होईल. येथे एकूण 24649 मतदार असून ते 156 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील तर 51 मतदान केंद्रे आहेत. धारबांदोडय़ातील 5 पंचायतीत 40 वॉर्डात मतदान होईल व तेथे एकूण 20095 मतदार आहेत. एकूण 123 उमेदवार रिंगणात असून 40 मतदान केंद्रे आहेत.
काणकोण, सांगे, केपे, धारबांदोडय़ात कमी उमेदवार
काणकोणमधील 7 पंचायतीत 56 वॉर्डात मतदान करण्यात येणार असून 27244 मतदार आहेत तर 169 उमेदवार आणि 56 मतदार केंद्रे आहेत. केपेतील 11 पंचायतीत 81 वॉर्डासाठी मतदान होईल. एकूण 34822 मतदार असून 240 उमेदवार तर 82 मतदान केंद्रे आहेत. मुरगांव तालुक्यातील 7 पंचायतीत 62 वॉर्डासाठी मतदान होणार आहे. तेथे 41383 मतदार 219 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून 73 मतदान केंद्रे आहेत.
उत्तर गोवा जिल्हय़ातील एकूण 97 पंचायतीत 742 वॉर्डासाठी मतदान होणार असून 385867 मतदार 2667 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील तर एकूण 765 मतदान केंद्रे आहेत. दक्षिण गोवा जिल्हय़ातील एकूण 89 पंचायतीत 722 वॉर्डात मतदान होईल. तेथे एकूण 411153 मतदार असून ते 2371 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत तर एकूण 752 मतदान केंद्रे आहेत उत्तर गोव्यात 41 तर दक्षिण गोव्यात 23 अशी मिळून एकूण 64 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.