भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात रविवारी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे. या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीवरून महत्त्वपूर्ण रणनीतिच्या अंतर्गत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. पंतप्रधानांनी रणनीतिसंबंधी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
या बैठकीचे अध्यक्षत्व भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केले. तर संघटनेचे पदाधिकारी बी.एल. संतोष देखील बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भाग घेतला. तर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत विचार मांडले आहेत. या बैठकीत भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या राज्यातील विकास तसेच कल्याणकारी योजनांचा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत मोदी सरकारच्या मागील 8 वर्षांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांचा तपशील जनतेसमोर मांडण्यासंबंधीच्या रणनीतविर चर्चा झाल्याचे समजते. जनकल्याणकारी धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे. तसेच ‘हर घर तिरंगा’ योजनेवर या बैठकीत चर्चा झाली आहे. आझादी का अमृत महोत्सवनिमित्त आयोजित होणाऱया कार्यक्रमांबद्दल विशेष पावले उचलण्याचा विचार बैठकीत व्यक्त झाला.
बैठकीत पक्षाच्या सुशासन विषयक धोरणावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःचे विचार मांडत राज्यांमधील नेतृत्वाला विकासकामांबद्दल मार्गदर्शन केल्याचे समजते. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली आहे.
यापूर्वी अशाप्रकारची बैठक डिसेंबर महिन्यात उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे झाली होती. तेव्हा 12 भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यात भाग घेतला होता. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी राज्यांचा विकास तसेच कल्याणकारी योजनांच्या कुशल अंमलबजावणीवर अधिक लक्ष देण्यावर भर दिला होता.