विरोधी गटनेतेपदासाठी सहा नगरसेवक इच्छुक
बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक सोमवार दि. 6 रोजी होणार असून निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भाजपकडे बहुमत असल्याने महापौरपदी कोणाची निवड होणार? याकडे लक्ष लागले आहे. तर महापालिकेत विरोधी गटाची भूमिका बजावण्यासाठी विरोधी गटनेत्याच्या पदासाठी सहा नगरसेवक इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या 58 वॉर्डांसाठी निवडणूक झाली होती. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक झाली होती. 58 पैकी 14 नगरसेवक मुस्लीम असून उर्वरित नगरसेवक अपक्ष आहेत. 35 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. तर महापालिकेवर भाजपच्या महापौर-उपमहापौरांची वर्णी लागणार आहे. महापौर पद सामान्य महिलेसाठी आणि उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या गोटात तीन नगरसेविका इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापौरपदावर विराजमान होण्यासाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, याकरिता काहींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे वशीला लावला असल्याची चर्चा आहे.
महापालिका प्रशासनाने महापौर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी चालविली आहे. सभागृहाच्या रंगरंगोटीसह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जुन्या इमारतीमध्ये सत्ताधारी, विरोधी आणि स्थायी समिती चेअरमन यांचे कक्ष होते. मात्र नव्या सभागृहातील सत्ताधारी, विरोधी आणि स्थायी समिती चेअरमन आदींना नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये कक्ष दिले जाणार आहेत. यादृष्टीने महापालिकेच्या कौन्सिल विभागाने तयारी केली आहे. सध्या असलेले फर्निचर व साहित्य नव्याने इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी तयारी सुरू असतानाच विरोधी गटातही गटनेते निवड करण्याच्या प्रक्रियेला जोर आला आहे. सध्या विरोधी गटात मुस्लीम नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नगरसेवक बाबाजान मतवाले, मुझम्मील डोणी, रियाज किल्लेदार, अझीम पटवेगार, रवी साळुंखे, सोहेल संगोळ्ळी आदी नगरसेवक विरोधी गटनेते पदासाठी इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.