ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्पाईसजेट या विमान कंपनीच्या सिस्टीमवर मंगळवारी रात्री रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला झाला. त्यामुळे आज सकाळच्या विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र, कंपनीच्या आयटी टीमने काही वेळातच ही सिस्टीम सुरळीत केली असून, विमानसेवा पूर्ववत झाली आहे. स्पाईसजेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
स्पाईसजेटच्या ट्विटनुसार, “स्पाईसजेटच्या सिस्टीम्सवर काल रात्री रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला. त्यामुळे सकाळच्या काही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला होता. तसेच आयटी सिस्टीम पूर्णत: मंदावली होती. पण स्पाईसजेटच्या आयटी विभागाने ही परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता विमानसेवा पूर्ववत झाली आहे.”
हॅकर्स रॅन्समवेअरच्या माध्यमातून सायबर हल्ला घडवून आणतात. हा व्हायरस संपूर्ण कंप्युटर सिस्टीम हॅक करतो. त्यामुळे कंप्युटर डेटा आणि इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्याचा वापर करायचा असल्यास त्यावर एक लिंक दिली जाते, ती लिंक ओपन केल्यावर त्यावर जेवढय़ा पैशांची मागणी होते, ते तुम्हाला द्यावे लागतात. अन्यथा ही सिस्टीम ते हॅक करून डेटा डिलीट करतात.