क्रीडामंत्र्यांच्या उपस्थितीमुळे क्रीडा समस्यांवर अधिक भर, शंकानिरसन, स्पष्टीकरण व समस्या सोडवण्याचे आश्वासन
वास्को : मुरगाव तालुक्यातील नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील नगरसेवक, पंच, समाजसेवक तसेच नागरिकांनी कला व संस्कृती, ग्रामीण विकास व क्रीडा खात्याचे मंत्री गोविंद गावडे व दारात आलेल्या प्रशासनासमोर विविध समस्या मांडल्या. शासकीय अधिकाऱ्यांनी काही समस्यांबाबत खुलासा केला तर मंत्र्यांनी या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत मंत्री गोविंद गावडे व प्रशासनाने लोकांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. काहींनी मंत्र्यांना आपल्या मागण्या व समस्यांसंबंधी निवेदनेही दिली. मुरगाव तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेला प्रशासन तुमच्या दारी हा सरकारचा उपक्रम बायणातील रवींद्र भवनमध्ये आायोजित करण्यात आला होता. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास यांच्यासह मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, जिल्हा पंचायत सदस्या अॅड. अनिता थोरात, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रमुदेसाई, विविध पंचायतींचे सरपंच, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी जयंत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर व कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास तसेच मंत्री गोविंद गावडे यांनी प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमांविषयी विचार मांडले. काही सूचना व आवाहनेही त्यांनी केली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच नागरिक व स्थानिक स्वाराज संस्थांचे लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्यांनी विविध प्रश्न मांडले व सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी केली. मुरगावचा प्रशासन तुमच्या दारी तब्बल तीन तास चालला.
वीज, पाणी, कचरा विल्हेवाट, गलिच्छता, वाहतुक, कदंब सेवा, कायदा व सुव्यवस्था, कला भवन, रवींद्र भवन, धुळ प्रदुषण, वाढते अपघात, एमपीटी मैदान, उत्पनाचे दाखले, इतर मागासवर्गीय दाखले, धाकतळेतील नाफ्ता दुर्घटनाग्रस्ताच्या नोकरीचा प्रश्न, 108 रुग्णवाहिका सेवा, स्वस्त धान्य दुकानांचा प्रश्न, जलस्रोत विभागाशी संबंधित प्रश्न, अशा विविध विषयांवरील प्रश्न लोकांनी मांडले व सोडवण्याची विनंती केली. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे क्रीडा मैदाने व क्रीडा सोयीसुविधांविषयीचे अधिक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागले. बहुतेक प्रश्नांवर मंत्री गोविंद गावडे यांनीच स्पष्टीकरण दिले व शंका निरसन केले तसेच प्रश्न निश्चितच सोडवले जातील असे आश्वासनही दिले. काही प्रश्नांवर उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी तसेच गोवा राज्य आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी वास्को मुरगावात होणारे प्रदुषण, मालवाहतुकीमुळे मातीने माखलेले रस्ते, अपघातांची भीती व्यक्त करून एमपीएकडून आपल्या जबाबदारीकडे होणारे दुर्लक्ष नजरेस आणून दिले. एमपीएने मुरगाव बंदरातून होणारी वाहतूक गेट क्रमांक एकमधून करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसा आदेश काढलेला आहे. त्या आदेशाचे पालन होत नसल्यानेच सर्व समस्या उपस्थित होत असल्याचे आमदार आमोणकर यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या निदर्शनास आणले. सरकार या प्रश्नाचा पाठपुरावा करेल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. काहींनी प्रशासनासमोर कौटुंबिक वादही मांडला. कुठ्ठाळीचे ग्रामस्थ दिलीप बांदोडकर यांनी जगप्रसिद्ध संत जुझे वाझ हे कुठ्ठाळी गावातील होते. परंतु त्यांच्या गावात त्यांची स्मृती जागवण्यासाठी काहीच नसल्याने या संताच्या स्मृतीसाठी एखादे स्मारक असावे, अशी मागणी केली.