Tarun Bharat

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

म. ए. समिती कार्यकर्त्यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : सर्वपक्षीयांचा सहभाग

प्रतिनिधी /कोल्हापूर

बेळगाव येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांनी उत्स्फूर्त आणि उत्साही सहभाग नोंदवला. कोल्हापुरातील सर्व पक्षांच्या नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह बेळगावचे माजी आमदार, माजी महापौर व पदाधिकाऱ्यांनी सीमावासियांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बेळगावातून सकाळी साडेदहाच्या सुमारास वाहनांतून कागलमध्ये दाखल झाले. यावेळी कर्नाटक हद्दीत कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कागलमध्ये सर्वपक्षांच्यावतीने समितीच्या कार्यकर्त्यांचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह मान्यवरांनी जल्लोषी स्वागत केले. त्यानंतर समितीचे कार्यकर्ते रॅलीने कोल्हापुरात दाखल झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीचे रूपांतर मोर्चात झाले. दसरा चौकात सीमाबांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यामध्ये लोकप्रतिनिधींसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भावना मांडल्या.

 एकीकरण समितीच्या नेत्यांसह बेळगावच्या माजी आमदार, माजी महापौर व पदाधिकाऱ्यांनी सीमावासियांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या. महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही गेली 67 वर्षे लोकशाही मार्गाने लढत आहोत. न्याय हक्कासाठी सुरू असलेला हा जगातील दुर्मीळ असा हा लढा आहे. तो जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मात्र आजवर आमचे हक्क, अधिकार दडपणाऱ्या कर्नाटक सरकारने आता एकही इंच जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी वल्गना करत पुन्हा सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचून अन्याय, अत्याचार सुरू केले आहेत. कर्नाटकात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत तेथील सरकारकडे इतर मुद्दे नसल्याने त्यांचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी वादग्रस्त विधाने करत सीमाप्रश्नी वाद निर्माण केला आहे. वास्तविक सीमाप्रश्नावर सध्या सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्यावर निकाल आलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची बैठक घेऊन निवडणुका होणार आहेत. या याविरोधात महाराष्ट्राने आता भूमिका घेत सीमाबांधवांसाठी पाठबळ देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने एक दिवसाचा महाराष्ट्र बंद ठेवून कर्नाटकसह केंद्र सरकारला मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले.

एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर आदींनी भावना मांडल्या. त्याचबरोबर माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, रेणु किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंठकर, युवा  समितीचे शुभम शेळके, प्रकाश मरगाळे, प्रकाश पाटील, मुरलीधर पाटील, सुनील अष्टेकर, निरा काकतकर, नगरसेवक रवि साळुंखे, माजी नगरसेवक महादेव हलगेकर, विजय भोसले, राजू सावंत, सुधा भातखंडे, हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, बी. एम. पाखरे यांच्यासह सीमाभागातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी नगरसेवक, माजी महापौर आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षियांची उपस्थिती

या आंदोलनात कोल्हापुरातील सर्व पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री भरमू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) विजय देवणे, संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश सदस्य महेश जाधव, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शेकापचे बाबुराव कदम, भाकपचे दिलीप पवार, जनता दलाचे शिवाजीराव परूळेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मनसेचे संजय करजगार, क्षत्रिय मराठाचे दिलीप पाटील आदी उपस्थित हेते.

लढ्यापासून दूर गेलेला युवक पुन्हा समरस

सीमावासियांच्या तीन-चार पिढ्या न्यायासाठी लढत असताना युवा पिढी मात्र काय मिळाले? असा प्रश्न विचारत होती. आजच्या आंदोलनाने महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठीशी आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे सीमाभागातील युवापिढीही आता सीमालढ्यात समरस होते आहे. हीच पिढी ज्येष्ठांच्या साथीने लढा जिंकेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

खासदार धैर्यशील माने यांचे पत्र अन् पाठिंबा

या आंदोलनाला सीमाप्रश्नाविषयी तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देणारे पत्र पाठविले. ते संयोजकांनी वाचून दाखवले. खासदार माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यावेळी उपस्थित होत्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन

नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाभाग केंद्रशासीत करावा, अशा मागणीचा ठराव शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला. ठाकरे यांचे अभिनंदन करत तो ठराव एकमताने मंजूर करावा, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.

बाळासाहेबांच्या शिवसेनेची रॅली

सीमावासियांच्या या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने रॅली काढून सहभाग घेत बळ दिले. शेकडो कार्यकर्ते रॅलीत आणि नंतर मोर्चा सहभागी झाले होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी याआधी आम्ही कर्नाटकच्या जुलूमशाहीविरोधात लढलो आहे. यापुढे सीमावासियांना न्याय देण्यासाठी लढत राहू, असे सांगत त्यांनी सीमा लढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार महिने कारवास भोगला आहे, ते सीमावासियांच्या मागे खंबीरपणे आहेत, असे सांगितले.

कोण काय म्हणाले……

  • महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकजुटीने सीमाबांधवांच्या पाठिशी : खासदार संजय मंडलिक
  • सीमाप्रश्नी भाषिक अहवाल मी आणि खासदार मंडलिक लोकसभेत मांडणार : खासदार धनंजय महाडिक
  • सीमाभागातील 865 खेडी, गावे केंद्रशासीत करा : माजी मंत्री भरमू पाटील
  • संपूर्ण कोल्हापूवासीय सीमावासीयांच्या पाठिशी : माजी खासदार निवेदिता माने.
  • सीमाबांधवांच्या आंदोलनात सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन : अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक
  • सीमाप्रश्नी सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्रित पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटावे : शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे
  • कर्नाटकची विधानसभा निवडणूक जवळ आल्याने मुख्यमंत्री बोम्माईंकडून सीमाप्रश्नी वाद निर्माण करण्याचा डाव : शिवसेना जिल्हा प्रखुख संजय पवार
  • कर्नाटकला मराठी माणसाची ताकद दाखविण्यासाठी एक दिवसाचा महाराष्ट्र बंद घ्या : बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील.

Related Stories

अतिक्रमण न काढल्याच्या निषेधार्थ शनिवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Archana Banage

15 दिवस झाले तरी अद्याप चौकशी अपूर्णच

Amit Kulkarni

स्वीमर्स-ऍक्वेरियस क्लबचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

Amit Kulkarni

आराधना शाळेत लसीकरण

Amit Kulkarni

अतिवाड येथील त्या प्रकरणाची सखोल चौकशी

Patil_p

महाराष्ट्रातून संभाजीराजे छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा

Abhijeet Khandekar