तरुण, तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग : पहाटे गल्लोगल्ली भगवेमय वातावरण
नेसरी/वार्ताहर
दुर्गामाता दौडचे आकर्षण सर्वांना लागले असून नवरात्री काळात सर्वत्र या दौडची सुरवात करण्यात येते. सीमाभागात या दुर्गामाता दौडला खूप महत्त्व असून खेडोपाडातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात या दौडीचे आयोजन करण्यात येते. नेसरीतही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत यावर्षी या दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच वर्षी या दुर्गामाता दौडला छोट्यासह, तरुण, तरुणी, नागरिक, महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे पहावयास मिळत आहे.
अनेक ठिकाणी नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड चालनारी पाहून नेसरीतील ठराविक तरुण एकत्र येत यंदा आपल्याही गावात दौडचे आयोजन करण्याचे ठरले आणि त्यासाठी मसनाई मंदिर येथे कोवाड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना बोलावून दौडबद्दलची महिती घेतली आणि सोमवारी घटस्थापणेपासून या दौडला सुरवात करण्याचे ठरले. पहिलेच वर्ष असल्यामुळे याला प्रतिसाद भेटणार की नाही अशी खात्री नसतानाच पहिल्या दिवसापासूनच तरुण वर्गाने उस्फुर्त सहभाग घेऊन दौडला चांगली सुरवात झाली. आणि प्रत्येक दिवशी ठरलेल्या गल्लीतील मार्गावरून दौडला जल्लोषात सुरवात होत आहे.
दररोज सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याजवळून दौडला ध्वज पूजनाने सुरवात होते. आणि ठरलेल्या गल्लीतील मार्गावरून घोषणा व स्फूर्तीगीत म्हणत दौडला प्रारंभ होतो. दौडच्या स्वागतासाठी गल्लोगल्ली भगव्या पताका व रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी घालून मोठ्या उत्साहात दौडचे स्वागत करण्यात येत आहे. गल्लोगल्ली भगव्या ध्वजाचे औक्षण महिला व फुलांची उधळण करताना युवती दिसून येत आहेत. दौड गावातील गल्लीतून फिरून आल्यानंतर त्या मार्गावरील मंदिरात आरती म्हणून प्रतिज्ञा व प्रेरणा मंत्राने दौडची सांगता करण्यात येत आहे. नऊ दिवस या दौडीचे आयोजन तरुणांकडून करण्यात आले आहे.