मुतगे येथे दौडला वाढता प्रतिसाद
तालुक्यासह मुतगे येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद लाभत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दररोज दौडला प्रारंभ करण्यात येत आहे. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून दौड मार्गक्रमण करत आहे. दौड निघणाऱया मार्गावर आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात येत आहेत. ठिकठिकाणी आरती ओवाळून दौडचे स्वागत करण्यात येत आहे. दौडमध्ये विविध देवदेवतांच्या घोषणांसह स्फूर्तिगीते म्हणण्यात येत आहेत. दौडमध्ये तरुणांसह बालचमूंचा सहभागही लक्षणीय आहे. शेवटी दौड पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ध्येयमंत्राने सांगता करण्यात येत आहे.
गणेशपूर येथे दौडचे भव्य स्वागत
गणेशपूर येथे दुर्गामाता दौडचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गणेशपूर विभागातर्फे दुर्गामाता दौड काढली जात असून गणेशपूर परिसरात भव्य स्वागत केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून ध्वज चढविण्यात येत आहे. सुवासिनींकडून गल्लोगल्ली ध्वजाचे औक्षण करण्यात येत आहे. या दौडमध्ये गणेशपूर, सरस्वतीनगर, क्रांतिनगर, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा गावांतील शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आंबेवाडीत दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
आंबेवाडी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे आयोजित दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सोमवारपासून दौडमध्ये तरुण व तरुणींनी लक्षणीय सहभाग घेतला आहे. दररोज पहाटे ग्रामदैवत श्री घळगेश्वर मंदिरात पूजा झाल्यानंतर प्रेरणामंत्राने दौडला सुरुवात करण्यात येत आहे.
दौड दरम्यान ’छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. गावातील प्रत्येक गल्लीत दौडचे जल्लोषात स्वागत केले जात असून, ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी गावातील सर्व मंदिरांमध्ये पूजन करून श्री घळगेश्वर मंदिरासमोर ध्येयमंत्राने सांगता होत आहे.
कल्लेहोळ येथे दौडला यंदापासून प्रारंभ
कल्लेहोळ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडला यंदापासूनच प्रारंभ करण्यात आला. दौडमध्ये गावातील अनेक युवक, युवती मोठय़ा संख्येने पांढरी-भगवी वस्त्रे परिधान करुन, डोकीवर पांढऱया, भगव्या टोप्या परिधान करून सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष मरूचे यासह गावातील अनेक मान्यवरांनीही या दुर्गामाता दौडमध्ये भाग घेऊन युवकांना प्रोत्साहन दिले. संपूर्ण गावामध्ये दुर्गामाता दौड धावणार आहे. यामुळे गावात नवचैतन्य दिसून येत असून ग्रामस्थांतून या दौडचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.
खानापूर येथील दुर्गादौड तिसऱया दिवशीही जल्लोषात
शिवप्रतिष्ठानतर्फे सुरू असलेला दौडच्या तिसरा दिवशी शिवस्मारक येथील शिवमूर्तीची पूजा महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, यात्रा कमिटीचे खजिनदार राजेंद्र चित्रगार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दौडच्या ध्वजाची पूजा करुन प्रारंभ करण्यात आला. निंगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, देसाई गल्ली, विठ्ठल मंदिर, गुरव गल्ली, घाडी, गल्ली, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बसवेश्वर मंदिर येथून रवळनाथ मंदिरात दौडची सांगता केली. दौडीत मोठय़ा संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या जयघोषात तसेच भक्तीगीत, भजन म्हणत दौड पुढे जात होती. गुरव गल्लीत दौडचे भव्य स्वागत करण्यात आले. गुरव गल्ली येथील महिलांनी दौडच्या ध्वजाला आरती केली. गुरव गल्लीत दौडच्या स्वागतासाठी रांगोळय़ा, काढण्यात आल्या होत्या. रवळनाथ मंदिराच्या आवारात आरती होऊन प्रेरणा मंत्राने दौडची सांगता झाली.
आजचा मार्ग
शिवस्मारक, मारुती मंदिर, रेल्वेस्टेशन, मन्सापूर, रामलिंग मंदिरा असोगा येथे सांगता.
उद्याचा मार्ग
शुक्रवार दि. 30 रोजी शिवस्मारक, महामार्ग, विद्यानगर, शाहूनगर, मिशनरी कपाऊंड, स्टेशनरोड, पोलीस क्वॉर्टर्स, दुर्गानगर, केएसआरपी कॅम्प, वाजपेयीनगर, श्री दुर्गा मंदिर येथे सांगता.