दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा मंदिर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये 2 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अपेक्षेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने युवा समितीच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा गटात स्पर्धा झाली. प्राथमिक व माध्यमिक गटात 1800 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयीन गटात 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी होते.
उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हुतात्मा प्रतिमेचे पूजन केले. मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उद्योजक महादेव चौगुले, आर. एम. चौगुले, मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अॅड. सुधीर चव्हाण, उद्योजक लक्ष्मण सैनुचे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अनिल पाटील, अंकुश केसरकर, सूरज कुडुचकर, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम यासह इतर उपस्थित होते.