प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राने कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस तसेच पावसाळय़ातील साथीच्या रोगांसंबधीची लस विशेषतः दिव्यांग व्यक्तींना देण्याची मोहीम सुरू केली असून 4 ऑगस्टपर्यंत काणकोणच्या अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व भागांतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी मोहनदास लोलयेकर यांनी श्रीस्थळ येथे जाऊन या मोहिमेत भाग घेऊन बूस्टर डोस घेतला आणि सुट्टीच्या दिवसांत देखील काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व अंगणवाडी सेविका करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
आज 1 रोजी आगोंद पंचायतीच्या मिरांडावाडा, पारवे, देसाईवाडा, 2 रोजी लोलये पंचायत क्षेत्रातील लोलये, माशे, माड्डीतळप, 3 रोजी खोतीगाव पंचायतीमधील नडके, कुसके, येडा या ठिकाणी लस देण्यात येणार असून त्या त्या पंचायत कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 4 रोजी पालिका क्षेत्रातील पाळोळे येथील स्पोर्ट्स क्लब, देवगीपुरुष सभागृह कोळंब, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, राजबाग-तारीर या ठिकाणी कोविड प्रतिबंधक आणि अन्य लस देण्यात येणार असून सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 पर्यंत मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर यांनी दिली आहे.