लता कित्तूर यांचे प्रतिपादन : आरपीडीमध्ये रंगला वार्षिक क्रीडामहोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. जीवन आणि खेळ या दोन्हींचे नाते खूप जवळचे आहे. सर्वगुण संपन्न खेळाडू जीवनाला परिपूर्ण अर्थाने समजू शकतो, असे प्रतिपादन एस.के.ई. सोसायटीच्या सदस्या व खजिनदार लता कित्तूर यांनी केले. एसकेई सोसायटी संचालित आरपीडी कला आणि वाणिज्य महाविद्यालय आयोजित वार्षिक क्रीडामहोत्सव 2021-22 च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. एसकेई सोसायटीचे सदस्य आणि एसकेई स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव नित्यानंद करमाळी, जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर, आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य के. बी. मेळेद कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. झेंडावंदन आणि मार्चपास्टने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्षभरात झालेल्या विविध सांघिक क्रीडा स्पर्धांत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थिनी प्रतिनिधी नुपूर रानडे हिने सूत्रसंचालन केले. क्रीडा सचिव अनुष्का शंकरगौडा हिने आभार मानले. क्रीडा संचालक डॉ. रामकृष्ण एन. यांच्यासह सहकाऱयांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. क्रीडा महोत्सवात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.