प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरानजीकच्या हॉटेल तानियासमोरील मैदानावर क्रीडा सुविधा उभारण्यासाठी क्रीडा खाते पावले उचलणार आहे. गेली बरीच वर्षे हे मैदान कोणत्याही सुविधांविना आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी नुकतीच या मैदानाला भेट देऊन पाहणी केली. मैदानाच्या विकासाचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले आहे.
चिरकोन उडी बेलाबाय या भागातील ही जमीन पूर्वी क्रीडा खात्याने टिळक मैदान प्रकल्पासाठी पार्किंगची सोय म्हणून राखीव ठेवली होती. त्यानंतर माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी येथे जलतरण तलाव उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी या शेत जमिनीत भराव घालून मैदानाचे स्वरुप देण्यात आले मात्र या जमिनीचा वापर मैदान म्हणून कधी झाला नाही. भव्य खरेदी-विक्री प्रदर्शने, जाहीर सभा व इतर कार्यक्रमांसाठीच या जमिनीचा वापर आतापर्यंत झाला आहे. या मैदानाचा नियोजित विकास झालाच नाही मात्र क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या मैदानाला भेट देऊन क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिग्ज, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक दीपक नाईक, गिरीष बोरकर, शासकीय अधिकारी व आमदार साळकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार दाजी साळकर यांनी क्रीडा मंत्र्यांकडे या मैदानावर वॉकिंग ट्रकसह, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी क्रीडा अधिकाऱयांशी सल्लामसलत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एकूण 22 हजार चौ. मि. जमीन उपलब्ध आहे.