लॅपटॉप, फ्रीजद्वारेही माहिती मिळवतोय चीन ः घरगुती वापराच्या सामग्रीत मायक्रोचिप
वृत्तसंस्था / लंडन
चीनचे हेरगिरीचे जाळे जगभरात इतके फैलावले आहे की तो आता ब्रिटनसारख्या देशांमधील कोटय़वधी लोकांची वैयक्तिक माहिती काही क्षणात प्राप्त करू शकतो. याकरता चीनने हेर नेमले नसून फ्रीज, लॅपटॉप, मोबाइल किंवा मिक्सर-ग्राइंडर यासारख्या घरगुती वापराची सामग्रीच पुरेशी आहे. ब्रिटनच्या सरकारने एका दीर्घ तपासानंतर घरोघरी वापरल्या जाणाऱया चिनी सामग्रीत मायक्रोचिप लावण्यात आली असून याद्वारे चीन वैयक्तिक स्वरुपाची माहिती मिळवत असल्याचे सांगितले आहे. तसेच वाहनांमध्ये वापरले जाणाऱया सुटय़ा भागांमध्येही हेरगिरी करणारी चिप असल्याचे सांगण्यात आले.
ब्रिटनच्या सरकारने स्वतःचे मंत्री आणि नागरिकांना त्यांच्या घरात लावण्यात आलेले एलईडी बल्ब देखील चीनचे हेरगिरी उपकरण ठरू शकते अशा शब्दांत सतर्क केले आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक सुरक्षेचे नसून राष्ट्रीय सुरक्षेचे असल्याचे सरकारने म्हटले आहे. ब्रिटनच्या अनेक विद्यापीठांनी चीनच्या कंपन्यांसोबत तंत्रज्ञानाशी संबंधित करार केले आहेत. या चिनी कंपन्या ब्रिटिश विद्यापीठांमधून संशोधनाशी निगडित माहितीची चोरी करत असल्याचा संशय ब्रिटनच्या सरकारला आहे. यातील बहुतांश कंपन्यांवर आफ्रिकेतील देशांमध्ये हेरगिरी केल्याचे आरोप झाले आहेत. तर बंदी घालण्यात आलेल्या कंपन्या नव्या नावानिशी पुन्हा सुरू झाल्या आहेत.
तांत्रिक उपकरणाचा हेरगिरीसाठी वापर होत असल्याच्या खुलाशामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीनच्या केवळ 3 कंपन्या ‘क्वेक्टेल’, ‘फायबोकॉम’ आणि ‘चायना मोबाइल’ने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेत 54 टक्क्यांची हिस्सेदारी प्राप्त केली आहे. जगातील 10 मोठय़ा लॅपटॉप कंपन्या याच तिन्ही कंपन्यांच्या सुटय़ा भागांचा वापर करतात. कनेक्टिव्हिटीशी निगडित उद्योगात या तीन कंपन्यांनी जागतिक बाजारात 75 टक्के हिस्सेदारी प्राप्त केली आहे. या तिन्ही कंपन्या चिनी सरकारच्या नियंत्रणात आहेत. टेस्लासारखी मोठी कार निर्माता कंपनी कनेक्टिव्हिटीसाठी याच तिन्ही कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करते.
5जी नेटवर्कद्वारे नजर
चिनी सामग्रीत बसविण्यात आलेली हेरगिरी चिप 5जी नेटवर्कद्वारे ऑपरेट होत आहे. या चिप्स चीनमध्ये वेगवेगळय़ा सर्व्हरशी लिंक्ड आहेत. यात ब्रिटनमधील प्रमुख व्यक्ती, संस्था आणि सैन्य हालचालींचा डाटा पोहोचत आहे. चीनच्या बहुतांश मोठय़ा कंपन्या सरकारी आहेत. विशेषकरून दूरसंचार क्षेत्रातील उत्पादने शासकीय कंपन्याच तयार करत आहेत. ही उत्पादने जगातील प्रत्येक देशात विकली जात आहेत.
सैन्यहालचालींची माहिती जमविण्याचा प्रकार
चीनने अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या प्रत्येक हालचालीची माहिती सहजपणे जमविली होती. अमेरिका कधी, किती आणि कुठली शस्त्रास्त्रs तैवानला देत आहे याची पूर्ण माहिती चीनने पूर्वीच मिळविली होती. शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्यापूर्वीच चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या चहुबाजूला घिरटय़ा घालण्यास सुरुवात केली होती. तसेच युद्धनौका तैनात केल्या होत्या.
दशकांपासून हेरगिरीसाठी वापर
लॅपटॉप, व्हॉइस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर, स्मार्ट वॉच, स्मार्ट एनर्जी मीटर, सीसीटीव्ही कॅमेरा, जगभरात पोलिसांकडून वापरण्यात येणारे कॅमेरे, डोरबेल कॅमेरे, कार्ड पेमेंट मशीन्स, हॉट टब, कार इत्यादींमधील चिपद्वारे चीन हेरगिरी करत आहे.