वृत्तसंस्था/ लुसेल
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ खेळांतील मिश्र दुहेरीतील सुवर्णपदक विजेती श्रीजा अकुला, दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि मनिका बत्रा यांनी मे महिन्यात होणाऱया दर्बान जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या एकेरी गटात उतरण्यासाठी पात्र होण्यात यश मिळविले आहे. मंगळवारी लुसेल येथील आशियाई डब्ल्यूटीटीसी कॉन्टनेंटल स्टेज 2023 स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांमध्ये त्यांनी कठीण आव्हानांवर मात केली.
श्रीजाने जागतिक क्रमवारीत 21 व्या क्रमांकावर असलेल्या चिनी तैपेईच्या चेन सू-यूचा 4-3 (11-2, 5-11, 2-11, 5-11, 13-11, 11-9, 11-8) असा पराभव केला. तर जागतिक क्रमवारीत 47 व्या क्रमांकावर असलेल्या शरथ कमलने इराणच्या अहमदियान अमीनवर 13-11, 11-3, 10-12, 11-7, 11-6 अशी मात करून जागतिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
जागतिक क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बत्राने हाँगकाँगच्या झू चेंगझूचा 13-11, 11-9, 11-6, 11-8 असा पराभव करत आपले स्थान निश्चित केले. मनिका आणि जी. साथियान यांनीही यश मिळविताना मिश्र दुहेरीत जपानच्या हिरोतो शिनोझुका आणि मियू यांचा 11-9, 12-10, 11-7, 5-11, 11-7.असा पराभव केला. साथियान आणि शरथ कमल या जोडीने पुरुष दुहेरीच्या लढतीत कतारच्या मोहम्मद अब्दुलवाहाब आणि खलील अल-मोहन्नदी यांचा 11-5, 11-0, 11-9, 11-8 असा पराभव करत जागतिक स्पर्धेत प्रवेश केला. ं
साथियान-शरथ या भारतीय जोडीला सोमवारी रात्री मा लाँग आणि युआन लायसेन या अव्वल चिनी जोडीविरुद्ध मॅरेथॉन सामना खेळावा लागला होता आणि 3-1 अशी आघाडी घेतल्यानंतर 11-4, 12-10, 5-11, 15-13, 7-11, 2-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागला होता. तथापि, त्यांनी मंगळवारी कतारी जोडीविरुद्धच्या विजयानंतर त्यांची जागतिक स्पर्धेसाठीची पात्रता निश्चित केली.
रीथ ऋष्य आणि श्रीजा या महिला दुहेरीच्या जोडीने सिंगापूरच्या गोई रुई झुआन आणि वोंग झिन रु यांचा 11-6, 12-10, 13-11, 11-7 असा पराभव करून शेवटच्या चार स्थानांपैकी एक स्थान मिळवले असले, तरी रीथचे जागतिक स्पर्धेतील स्थान अद्याप पक्के झालेले नाही. कारण ती एकेरीत पात्र ठरण्यात अपयशी ठरली आहे. त्याच्या तुलनेत मनिका आणि अर्चना कामथ यांना जास्त चांगली संधी आहे.