एफआयएच पुरस्कार : ग्रॅहम रीड, स्कॉपमन सर्वोत्तम प्रशिक्षक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे पीआर श्रीजेश व सविता पुनिया यांची एफआयएचने वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड केली. सलग दुसऱयांदा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय संघासाठी 16 वर्षे खेळणाऱया श्रीजेशने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून देताना एफआयएच हॉकी प्रो लीगमधील सर्व 16 सामन्यांत भाग घेतला. त्यात भारताने तिसरे स्थान मिळविले. त्यानंतर बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहाही सामन्यांत त्याने भाग घेतला आणि भारताला या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. ‘34 वर्षीय श्रीजेशचे वय वाढत असले तरी तो आपला खेळ उंचावत असल्याचे दिसून येते,’ असे एफआयएचने त्याचे कौतुक करताना म्हटले आहे.
श्रीजेशला 39.9 टक्के मते मिळाली. त्यानंतर बेल्जियमच्या लोईक व्हान डोरेनला 26.3, नेदरलँड्सच्या प्रिमिन ब्लाकला 23.2 मते मिळाली. तज्ञ (40 टक्के), विविध संघ (20 टक्के), चाहते (20 टक्के), मीडिया (20 टक्के) यांनी या पुरस्कारासाठी ऑनलाईन मतदान केले.
सलग दुसऱयांदा हा पुरस्कार मिळविणारा श्रीजेश हा एकंदर तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी आयर्लंडचा डेव्हिड हार्ट (2015, 2016) व बेल्जियमचा व्हिन्सेंट व्हॅनाश (2017 ते 2019) यांनी हा मान प्राप्त केला आहे. यापैकी व्हॅनाशने सलग तीनवेळा हा पुरस्कार मिळविला आहे. श्रीजेशने या कालावधीत 250 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पाही पार केला. असा पराक्रम करणारा तो आठवा भारतीय असून जगातील एकमेव गोलरक्षक आहे. ‘हा अतिशय स्पेशल पुरस्कार आहे, यात कोणतीच शंका नाही. कारण हॉकी चाहत्यांनी त्यासाठी मतदान केले आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा सन्मान असून आजवर केलेल्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे,’ अशा भावना श्रीजेशने व्यक्त केल्या.
महिलांमध्ये भारताच्या 32 वर्षीय सविता पुनियाने सर्वाधिक मते मिळवित हा बहुमान पटकावला. तिला 37.6 गुण मिळाले. अर्जेन्टिनाची महान खेळाडू बेलेन सक्सीने दुसरे स्थान घेताना 26.4 गुण तर ऑस्ट्रेलियाच्या जोसलीन बार्टमने (16) तिसरे स्थान मिळविले. 2014 पासून सर्वोत्तम महिला गोलरक्षक पुरस्काराची सुरुवात केली असून हा पुरस्कार सलग दुसऱयांदा मिळविणारी सविता ही तिसरी गोलरक्षक आहे. 2021-22 मध्ये भारतीय महिलांनी एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये पदार्पण केले, त्यावेळी भारताला पोडियमवर स्थान मिळाले. तिने या स्पर्धेतील 14 सामन्यात तब्बल 57 वेळा प्रतिम गोलरक्षण करीत भारतावरील धोका टाळला होता.
ग्रॅहम रीड, स्कॉपमन सर्वोत्तम प्रशिक्षक
भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड, जॅनेक स्कॉपमन यांची एफआयएचने वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्कारासाठी निवड केली. रीड यांना सलग दुसऱयांदा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना मतदानात 31.4, नेदरलँड्सच्या जेरॉन डेल्मी यांना 26.9, बेल्जियमचे प्रशिक्षक मिचेल व्हान डेन हय़ुवेल यांना 20.2 गुण मिळाले. सर्वोत्तम महिला विभागातील प्रशिक्षक म्हणून मागील वर्षी भारताच्या सोएर्द मारिने यांना पुरस्कार मिळाला होता. महिला विभागातील सर्वोत्तम प्रशिक्षक स्कॉपमन यांना 38.2 गुण तर नेदरलँड्सच्या जेमिलन मुल्डेर्स यांना 28.2, ऑस्ट्रेलियाच्या कॅटरिना पॉवेल यांना 19.5 गुण मिळाले.