सप्ताहाला 124 वर्षांची वैभवशाली परंपरा : दुपारी जोशी कुटुंब अर्पण करणार श्रीफळ,मंदिरात गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना.मुरगाव हिंदू समाजातर्फे महाप्रसाद सेवा
प्रतिनिधी /वास्को
श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला आज बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. दुपारी 12 वा. जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून 24 तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला विधिवत सुरुवात होईल. गुरुवारी दुपारी गोपाळ काल्याने या उत्सवाची उत्साहात सांगता होईल.
मागची दोन वर्षे भजनी सप्ताह कोरोना संसर्गामुळे मर्यादीत व पारंपरिक स्वरूपातच साजरा करण्यात आला होता. यंदा फारसे निर्बंध नाहीत. केवळ मंदिरात प्रवेश करण्यासंदर्भात काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. भाविकांनी कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
यंदा देवदर्शन खुले असले तरी मंदिरात गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. मात्र, कालपासून वास्को शहरात भरगच्च फेरी भरलेली असून आजपासून ही फेरी लोकांनी गजबजणार आहे.
जयतिर्थ मेहुंडी यांची मैफल रंगली
भजनी सप्ताह उत्सवातील कार्यक्रमांना मंगळवारपासून सुरुवात झाली. रात्री मंदिरासमोर उभारलेल्या मंडपात खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गायक जयतिर्थ मेहुंडी (धारवाड) यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. या कार्यक्रमाला श्रोत्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जयतीर्थ मेहुंडी यांना ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, तबल्यावर अजिंक्य जोशी (पुणे), पखवाजवर प्रथमेश तारळकर (पुणे) व मंजिरीवर योगेश रायकर साथसंगत केली.
आज ऋषिकेश बडवे यांच्या दोन मैफिली
आज बुधवारी दुपारी भजनी सप्ताहाला प्रारंभ झाल्यानंतर रात्री वास्को शहरात ऋषिकेश बडवे यांच्या शास्त्रीय गायनाच्या दोन बैठका नटराज थिएटर व जोशी चौकात होईल. यंदा केवळ बाजारकर समितीचाच पार, दिंडी व गायनाच्या बैठका असतील. गायक बडवे यांना हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर, तबल्यावर शैलेश गांवकर, पखवाजवर किशोर तेली तर मंजिरीवर योगेश रायकर साथसंगत करतील. दुसऱया बैठकीला रात्री 12 वा. प्रारंभ होईल.
मंदिरात गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
यंदा मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना देवदर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मर्यादीत उपस्थितीत भजनी सप्ताहाचा प्रारंभीचा विधी होईल. चोवीस तासांचे अखंड भजन यंदा विविध भजनी मंडळांतर्फे प्रत्यक्ष सादर करण्यात येईल.
दुपारी दोन वाजल्यापासून श्री दामोदर मंदिरामध्ये अखंड 24 तास साखळी पद्धतीने होणाऱया स्थानिक भजनी पथकांची भजने असतील. त्यात बेलाबाय भजनी मंडळ, त्रिमूर्ती भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, कलादीप भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, त्रिशुल खाप्रेश्वर भजनी मंडळ, मुशेले कला मंडळ, शिवप्रासादिक भजनी मंडळ, साईबाबा भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, ॐकार संगीत भजनी मंडळ, संतोषी माता भजनी मंडळ, स्वरब्रह्म भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ, शिवसमर्थ भजनी मंडळ, राष्ट्रोळी भजनी मंडळ, ओरूले दत्तवाडी भजनी मंडळ, मधुकर मांजरेकर भजनी मंडळ, राजाराम भजनी मंडळ, ॐ विष्णु कला सांस्कृतिक संस्था, शारदा संगीत विद्यालय, गणपती पंचायतन भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ ही पथके भाग घेतील. मात्र, भजन सादर करण्यासाठी मर्यादीत कलाकारांनाच प्रवेश देण्यात येईल.
भजनी सप्ताह समाप्तीचा गोपाळ काला मंदिराऐवजी बाहेरील खुल्या मंडपात होणार आहे. स्वातंत्र्यपथ व फा. जुझे वाझ मार्गावरील वाहतूक एफ.एल. गोम्स मार्गावरून वळवण्यात आलेली असून आज व उद्यापर्यंत वास्को शहरात अवजड वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.
दरम्यान, दामोदर भजनी सप्ताह उत्सवानिमित्त मुरगांव हिंदू समाजातर्फे अन्नप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्यवस्था श्री दामोदर मंदिरामागील सारस्वत बँकेजवळ दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.