वृत्तसंस्था/ कोलंबो
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया दुसऱया क्रिकेट कसोटीसाठी लंकन क्रिकेट मंडळाने मंगळवारी लंकन संघाची घोषणा केली. घोषित केलेल्या संघामध्ये फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाला वगळण्यात आले.
या मालिकेतील पहिली कसोटी गॅलेमध्ये झाली आणि ऑस्ट्रेलियाने केवळ तीन दिवसामध्ये लंकेचा पराभव करून या मालिकेत आघाडी मिळविली. या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये तो पॉझिटीव्ह आढळला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. लागलीच जयविक्रमाला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लंकन संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली पण ते सर्व निगेटिव्ह असल्याचे लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. लंकन संघातील अष्टपैलू मॅथ्यूज या आगामी दुसऱया कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. गेल्या शुक्रवारी तो कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यातील दुसरी आणि शेवटची कसोटी गॅलेच्या मैदानावर शुक्रवारपासून सुरू होत आहे. या कसोटीसाठी लंकन संघामध्ये महेश तिक्षणा, लक्षिता मनसिंघे आणि डी. वेलालगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या मालिकेतील झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने लंकेचा 10 गडय़ांनी पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने पहिल्या डावात 212 धावा जमविल्या होत्या. डिक्वेलाने 58 तर मॅथ्यूजने 39 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लेयॉनने 90 धावात 5 गडी बाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 321 धावा जमविल्या. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरुन ग्रीन यांनी अर्धशतके झळकविली. लंकेच्या रमेश मेंडिसने 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 109 धावांची आघाडी मिळविली होती. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा दुसरा डाव 113 धावात आटोपला. लियॉन आणि हेड यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 5 धावांची जरुरी होती आणि त्यांनी हा सामना दहा गडय़ांनी जिंकला.