मालिका 1-1 बरोबरीत, चंडिमलचे नाबाद द्विशतक
वृत्तसंस्था/ गॅले
दिनेश चंडिमलचे पहिले द्विशतक आणि पदार्पणवीर प्रभात जयसूर्याने सामन्यात मिळविलेले 12 बळी यांच्या बळावर यजमान लंकेने दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी बलाढय़ ऑस्ट्रेलियावर एक डाव 39 धावांनी दणदणीत विजय मिळवित दोन कसोटींची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. चंडिमल मालिकावीर तर जयसूर्या सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
लंकेने पहिल्या डावात सर्व बाद 554 धावा जमविल्या, त्यात चंडिमलच्या नाबाद 206 धावांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 364 धावा जमविल्या होत्या. त्यामुळे लंकेला पहिल्या डावात 190 धावांची भक्कम आघाडी मिळाली. त्यानंतर डावखुरा स्पिनर जयसूर्याने पहिल्या डावाप्रमाणे भेदक माऱयावर 6 बळी मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 151 धावांत संपुष्टात आणत दणदणीत विजयासह मालिका बरोबरीत राखली.
ऑफस्पिनर रमेश मेंडिसने वॉर्नरला चहापानाआधी 24 धावांवर पायचीत केल्यानंतर शेवटच्या सत्रात जयसूर्याने पूर्ण वर्चस्व राखत उस्मान ख्वाजा (29), स्टीव्ह स्मिथ (0) यांना एकाच षटकात बाद केले. 30 वर्षीय जयसूर्याने नंतर आणखी एका षटकात दोन बळी मिळवित ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. रमेश व आणखी एक पदार्पणवीर स्पिनर महीश तीक्षणाने प्रत्येकी दोन बळी मिळविल्यावर जयसूर्याने शेवटचा बळी टिपल्यानंतर लंकेने विजयी जल्लोष सुरू केला. जयसूर्याचा हा पदार्पणाचा सामना असून त्याने पहिल्या डावातही सहा बळी मिळविले होते. त्याने सामन्यात 177 धावांत 12 बळी मिळवित लंकेतर्फे नवा विक्रम नोंदवला. यापूर्वी प्रवीण जयविक्रमाने पदार्पणात 11 बळी टिपण्याचा विक्रम केला होता.
मात्र लंकन विजयाचा पाया रचला तो दिनेश चंडिमलने. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर चौफेर हल्ला करीत संघाला दोनशेच्या जवळपास आघाडी मिळवून दिली. त्याने शेवटच्या 47 धावा केवळ 28 चेंडूत फटकावताना स्टार्कच्या एका षटकात चार चौकार व 2 षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. स्टार्कने चार बळी मिळविले तर लेगस्पिनर स्वेप्सनने 3 बळी मिळवित लंकेचा डाव 554 धावांत संपुष्टात आणला.
6 बाद 431 धावांवरून लंकेने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. सकाळी खेळ सुरू होण्याआधी त्यांचा सलामीवीर पथुम निसांका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले. गेल्या दोन आठवडय़ात कोरोनाची लागण होणारा तो लंकेचा सहावा खेळाडू आहे. चंडिमल व रमेश मेंडिस यांनी 68 धावांची भागीदारी केली तर चंडिमलने 13 वे कसोटी शतक रविवारीच पूर्ण केले होते. मेंडिस बाद झाल्यानंतर चंडिमलने फटकेबाजी करीत 164 ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्याही पार केली. चंडिमल व पदार्पण करणारा कमिंदू मेंडिस (61) यांनी तिसऱया दिवशी पाचव्या गडय़ासाठी 133 धावांची भागीदारी केली होती.
लंकेची आता पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटींची मालिका होणार असून याच मैदानावर पहिली कसोटी शनिवारी 16 जुलैपासून सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 364, लंका पहिला डाव 181 षटकांत सर्व बाद 554 ः निसांका 6, करुणारत्ने 86, कुसल मेंडिस 85, अँजेलो मॅथ्यूज 52, चंडिमल नाबाद 206 (326 चेंडूत 16 चौकार, 5 षटकार), कमिंदू मेंडिस 61 (139 चेंडूत 7 चौकार), डिक्वेला 5, रमेश मेंडिस 29, तीक्षणा 10, अवांतर 14. गोलंदाजी ः स्टार्क 4-89, स्वेप्सन 3-103, लियॉन 2-194, कमिन्स 1-95. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 41 षटकांत सर्व बाद 151 ः वॉर्नर 24, उस्मान ख्वाजा 29, लाबुशाने 32, स्मिथ 0, हेड 5, ग्रीन 23, कॅरे नाबाद 16, स्टार्क 0, कमिन्स 16, लियॉन 5, स्वेप्सन 0, अवांतर 1. गोलंदाजी ः प्रभात जयसूर्या 6-59, रमेश मेंडिस 2-47, महीश तीक्षणा 2-28.
कसोटी पदार्पणात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
गोलंदाज (संघ) / बळी / दिलेल्या धावा / प्रतिस्पर्धी / वर्ष / ठिकाण
नरेंद्र हिरवाणी (भारत) / 16 / 136 / विंडीज / 1988 / चेन्नई
बॉब मॅसे (ऑस्ट्रेलिया) / 16 / 137 / इंग्लंड / 1972 / लॉर्ड्स
प्रेड मार्टिन (इंग्लंड) / 12 / 102 / ऑस्ट्रेलिया / 1890 / ओव्हल
प्रभात जयसूर्या (श्रीलंका) / 12 / 177 / ऑस्ट्रेलिया / 2022 / गॅले
जेसॉन क्रेझा (ऑस्ट्रेलिया) / 12 / 358 / भारत / 2008 / नागपूर.
श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च कसोटी धावसंख्या
धावा / वर्ष / ठिकाण
554 / 2022 / गॅले
8-547 घोषित / 1992 / कोलंबो
473 / 2011 / कोलंबो.