आंदोलक आक्रमक, गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या वर्षभरापासून श्रीलंका (Sri Lanka) आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा रोष अजूनही कमी झालेला नाही. देशभरात तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना लोक पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa President of Sri Lanka) यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांच्या जमावाने त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, जमावाने राष्ट्रपतींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढला.
दरम्यान, शनिवारी मोठ्या संख्येनं आंदोलकांनी रस्त्यावर उतरले. यांनतर त्यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला. आंदोलक आक्रमक झाले असल्यानं तसंच आधी जाळपोळीच्या घटना देशात घडल्या असल्यानं लंकेच्या राष्ट्रपतींनी निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी हजारोंच्या संख्येनं निवासस्थानाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
हे ही वाचा : १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद धनुष्यबाणात; संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल
आंदोलकांनी लंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवून आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानी घुसले आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. दरम्यान, आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. दुसरीकडे पंतप्रधानांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अन्नापासून ते इंधनापर्यंत संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. घरांमध्येही वीज काही तासच येत आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा सतत कमी होत असल्याने ते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक वस्तूही आयात करू शकत नाही.