माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे नौदल तळाच्या आश्रयाला
वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे निर्माण झालेला असंतोष आता गृहयुद्धाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी जनतेच्या दबावामुळे सोमवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे नाराज समर्थकांनी राजधानी कोलंबोमध्ये हिंसा सुरू केल्याने विरोधक देखील भडकले आहेत. राजपक्षे यांच्या समर्थकांनी कोलंबोतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वाहनांना ठिकठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाने पूर्व श्रीलंकेतील त्रिनकोमाली नौदल तळात आश्रय घेतल्याचे वृत्त आहे. त्यांना एका हेलिकॉप्टरद्वारे या तळापर्यंत नेण्यात आले. याची माहिती मिळताच तळाबाहेर निदर्शकांनी गर्दी केली आहे. हिंसक विरोध दडपण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने शूट ऍट साइटचा आदेश दिला आहे.
श्रीलंकेतील या नव्या हिंसेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी आहेत. उपचारासाठी 217 जणांना दाखल करण्यात आल्याची माहिती कोलंबो नॅशनल हॉस्पिटलने दिली आहे. श्रीलंकेतील हिंसा पाहता भारत सरकारने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल ऍड्रेस जारी केला आहे.
श्रीलंकेतील खासदार जनक बंडारा तेनाकून यांच्या दांबूला येथील घराला निदर्शकांनी पेटवून दिले आहे. निदर्शकांनी याचबरोबर माजी मंत्री रोहिता अबेगुणवर्धने यांच्या निवासस्थानावर हल्ला केला आहे. हिंसक वातावरण पाहता श्रीलंका बार असोसिएशनने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
महिंदा यांना अटक करण्याची मागणी
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी महिंदा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. महिंदा यांनी शांततेत निदर्शने करणाऱया लोकांना चिथावणी दिल्याने हिंसा सुरू झाल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. निदर्शकांनी सोमवारी हंबनटोटामध्ये राजपक्षे यांच्या मूळ घराला पेटवून दिले आहे. तर राजधानी कोलंबोमध्ये माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांना कारसह तलावात ढकलून देण्यात आले. आतापर्यंत 12 हून अधिक मंत्र्यांची घरे पेटवून देण्यात आली आहेत.
पंतप्रधान निवासस्थानाबाहेर गोळीबार
हजारो निदर्शकांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ‘टेम्पल ट्री’चे मुख्य प्रवेशद्वार तोडून तेथे उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिले हेत. त्यानंतर निवासस्थानात गोळीबार देखील झाला. उग्र होत चाललेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला तसेच हवेत गोळीबार केला. पंतप्रधानांच्या निवासस्थानातील हिंसेसाठी श्रीलंका पोडुजाना पेरामुना हा पक्ष जबाबदार असल्याचा दावा अर्जुना रणतुंगा यांनी केला आहे.
खासदाराचा मृत्यू
श्रीलंकेतील खासदार अमरकीर्ति अथुकोरला यांच्यावर निदर्शकांनी गोळीबार केला होता. ज्यानंतर ते जमावापासून वाचण्यासाठी इमारतीत लपले होते. तेथूनच त्यांचा मृतदेह हस्तगत झाला आहे. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महिन्यात दुसऱयांदा आणीबाणी
खराब आर्थिक स्थितीमुळे सर्वसामान्य लोकांनी शुक्रवारी संसदेबाहेर हिंसक निदर्शने केली होती. त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पुन्हा आणीबाणी लागू केली होती. श्रीलंकेत एका महिन्यात दुसऱयांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आणीबाणी लागू केली गेली होती.