Tarun Bharat

आशिया जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तान फायनल आज

Advertisements

शेवटच्या सुपर-4 सामन्यात विजय मिळवल्याने लंकेचे मनोबल उंचावले

दुबई / वृत्तसंस्था

देशांतर्गत स्तरावर सामाजिक-आर्थिक स्तरावर अभूतपूर्व संकटाशी दोन हात करणारे पाकिस्तान व श्रीलंकेचे क्रिकेट संघ आज (रविवार दि. 11) आशिया जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. यापूर्वी सुपर-4 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले असू शकते. मात्र, नाणेफेकीचा कौल सर्वाधिक महत्त्वाचा ठरु शकतो. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.

तांत्रिकदृष्टय़ा, श्रीलंका यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होते. मात्र, देशांतर्गत अराजक परिस्थितीमुळे त्यांना यातून माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर ही स्पर्धा युएईत हलवण्यात आली.

यंदा आशियाई क्रिकेट कौन्सिल असो किंवा सर्वसामान्य चाहते. यातील सर्वांनाच आशिया चषक स्पर्धेची फायनल भारत-पाकिस्तान यांच्यात व्हावी, असे वाटत होते. पण, प्रत्यक्षात भारतीय संघाने प्रत्येक आघाडीवर हाराकिरी केली आणि यंदा आशिया चषक जेतेपदासाठी आज पाकिस्तानसमोर भारत नव्हे तर श्रीलंकेचा संघ प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकत आहे.

दुबईत पाकिस्तानी नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य असून त्यांनी पाकिस्तान संघाच्या सर्व सामन्यांना मोठय़ा प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे. आजचा सामनाही त्याला अपवाद असण्याचे कारण नसेल. मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह यांनी यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून त्यात आजही सातत्य राखण्याचे त्यांचे मुख्य लक्ष्य असेल.

श्रीलंकेचा संघ कागदावर पाकिस्तानइतका भारी नसला तरी शेवटच्या सुपर-4 लढतीतील निकालातून त्यांनी काहीही होऊ शकते, याचाच दाखला दिला. या क्रिकेट प्रकारात ते 2014 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स ठरले होते. वास्तविक, लंकन क्रिकेटला खराब निवडी व अंतर्गत राजकारणाने बरेच पोखरुन काढले आहे. पण, तरीही या संघाने अंतिम फेरीत धडक मारत आपल्या जिद्दीचे व संघर्षयम खेळाचे प्रत्यंतर घडवले आहे.

सहा महिन्यांपूर्वी भारत दौऱयावर आलेल्या शनाकाच्या नेतृत्वाखालील संघात व आताच्या संघात फारसे मोठे बदल नाहीत. पण, टी-20 मध्ये लंकेने त्यांचा गेमप्लॅन बदलला असून त्यात त्यांनी आक्रमणाची धार आणली. अगदी दुष्मंता चमीरासारखा अव्वल गोलंदाज संघात नसताना देखील त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला सातत्याने पेचात टाकण्यात कसर सोडलेली नाही.

फलंदाजीत कुशल मेंडिस, पथूम निस्सांका या सलामीवीरांनी उत्तम योगदान दिले असून दनुष्का गुणतिलका, भानुका राजपक्ष, स्वतः शनाका व चमिका करुणारत्ने यांनी मधल्या फळीत धावगती उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अफगाणविरुद्ध 170 धावांच्या आसपासचे टार्गेट पार करताना त्यांच्या एकाही फलंदाजाने 35 पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. पण, तरी त्यांच्या जवळपास सर्व फलंदाजांचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा अधिक राहिला होता. आतापर्यंत झालेल्या आशिया चषकातील 5 सामन्यात लंकन फलंदाजांनी 28 षटकार व 62 चौकार फटकावले असून यातूनच त्यांचा आक्रमक पवित्रा स्पष्ट होतो.

गोलंदाजीत, महिश तिक्षणा व वणिंदू हसरंगा यांनी सातत्यपूर्ण, भेदक मारा साकारला असून दिलशान मदुशनकाने आघाडीच्या मध्यमगती-जलद गोलंदाजांची भूमिका चोख बजावली आहे.

संभाव्य संघ

श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, पथूम निसांका, कुशल मेंडिस, चरिथ असलंका, भानुका राजपक्ष, अशेन बंदारा, धनंजया डीसिल्व्हा, वणिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, जेफ्री व्हॅन्दरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशनका, मथिशा पाथिराना, नुवानिदू फर्नांडो, दिनेश चंडिमल.

पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाझ दहानी, उस्मान कादीर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

बाबर आझमचा खराब फॉर्म पाकिस्तानसाठी डोकेदुखी

पाकिस्तानचा संघ यंदा फायनलमध्ये पोहोचला असला तरी बाबर आझमचा खराब फॉर्म या संघासाठी मुख्य डोकेदुखी ठरत आले आहे. त्याला या स्पर्धेतील 5 सामन्यात केवळ 63 धावा जमवता आल्या असून आजच्या लढतीत तो याची सारी कसर भरुन काढणार का, याची उत्सुकता असेल. आक्रमक गोलंदाजी लाईनअप ही पाकिस्तानची मजबुती असून नसीम शाह दिवसागणिक प्रगल्भ होत चालला असून त्याला हॅरिस रौफ व मोहम्मद हसनैन यांची साथ लाभत आली आहे. फिरकीच्या आघाडीवर, लेगस्पिनर शदाब खान (इकॉनॉमी 5.79, 7 बळी) व डावखुरा ऑर्थोडोक्स मोहम्मद नवाझ (इकॉनॉमी 6.05, 8 बळी) हे देखील प्रभावी ठरत आले आहेत.

पुन्हा महत्त्वाचा ठरणार नाणेफेकीचा कौल!

दुबईमध्ये नाणेफेकीचा कौल सातत्याने महत्त्वाचा ठरत आला असून नाणेफेक जिंकणाऱया संघाने प्रतिस्पर्ध्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करणे आणि त्यानंतर धावांचा सहज पाठलाग करुन विजय मिळवणे अंगवळणी पडले आहे. त्यातच पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना इतका प्रभावी ठरत नाही, हे लंकेविरुद्ध शेवटच्या सुपर-4 फेरीत सुस्पष्ट झाले. पाकिस्तानने भारत व लंका यांच्याविरुद्ध पराभव पत्करले, त्यावेळी त्यांनी पहिली फलंदाजी केली होती, हे देखील सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आज पाकिस्तानवर पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीची वेळ आली तर ते आपल्या रणनीतीत काय बदल करणार, याची उत्सुकता असेल.

Related Stories

ऑस्ट्रेलियन कसोटी संघात हॅरीसचे पुनरागमन

Patil_p

संजू सॅमसन-स्टीव्ह स्मिथची आक्रमक अर्धशतके

Patil_p

चायनीज जिम्नॅस्ट चेन्चेनला बॅलन्स बीमचे सुवर्ण

Patil_p

कोहली, इशांत, हार्दिक, अक्षरचे पुनरागमन

Patil_p

स्वायटेक अंतिम, सिलिक, रूड उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

कोहली, रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा यांची शिफारस

Amit Kulkarni
error: Content is protected !!