वृत्तसंस्था/ ढाका
श्रीलंकेने यजमान बांगलादेशविरूद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात लंकेने बांगलादेशचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. लंकेचा वेगवान गोलंदाज असिता फर्नांडोने या सामन्यात पहिल्या डावात 93 धावांत 4 तर दुसऱया डावात 51 धावांत 6 असे एकूण 144 धावांत 10 बळी मिळविले.
या शेवटच्या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 365 धावा जमविल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 506 धावांचा डोंगर उभा केला. 141 धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा दुसरा डाव 169 धावांत आटोपला. लंकेला विजयासाठी केवळ 29 धावांची जरूरी होती. लंकेने तीन षटकांत बिनबाद 29 धावा जमवित हा सामना 10 गडय़ांनी जिंकला. उभय संघातील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली गेली.
बांगलादेशने 4 बाद 34 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. आठव्या षटकांत बांगलादेशचा फलंदाज मुश्फिकुर रहीम रजिताच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. त्यानंतर अष्टपैलू शकीब अल हसनने एकेरी आणि दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. लिटॉन दास आणि शकीब अल हसन या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 103 धावांची भागिदारी केली. असिता फर्नांडोने दासला झेलबाद केले. त्याने 135 चेंडूत 3 चौकारांसह 52 धावा जमजविल्या. लिटॉन दासने या मालिकेतील पहिल्या कसोटीत 88 तर दुसऱया कसोटीतील पहिल्या डावात 141 धावांची खेळी केली होती. लिटॉन दासने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा आपल्या 33 व्या कसोटीत गाठला. बांगलादेश संघातील अष्टपैलू शकीब अल हसनने कसोटीतील आपले 27 वे अर्धशतक 62 चेंडूत झळकविले. असिता फर्नांडोने शकीब अल हसनला झेलबाद केले. त्याने 72 चेंडूत 7 चौकारांसह 58 धावा जमविल्या. टी इस्लाम, एम हुसेन, खलीद अहमद हे शेवटचे फलंदाज लवकर बाद झाल्याने बांगलादेशचा दुसरा डाव 55.3 षटकांत 169 धावांत आटोपला. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 51 धावांत 6, रजिताने 40 धावांत 2 आणि रमेश मेंडीसने 1 गडी बाद केला. लंकेला विजयासाठी 29 धावांची जरूरी होती. त्यांनी 3 षटकांत बिनबाद 29 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली. ओशादा फर्नांडोने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 21 तर कर्णधार करूणारत्नेने 1 चौकारांसह नाबाद 7 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव- 116.2 षटकांत सर्वबाद 365, लंका प. डाव-165.1 षटकांत सर्वबाद 506, बांगलादेश दु. डाव-55.3 षटकांत सर्वबाद 169 (मेहमुदुल हसन 15, तमीम इक्बाल 0, नजमुल हुसेन 2, मुश्फिकुर रहीम 23, लिटॉन दास 52, शकीब अल हसन 58, एम. हुसेन 9, असिता फर्नांडो 6-51, रजिता 2-40, रमेश मेंडीस 1-20), लंका दु. डाव-3 षटकांत बिनबाद 29 (ओशादा फर्नांडो नाबाद 21, करूणारत्ने नाबाद 7).