Tarun Bharat

लंकेचा ऑस्ट्रेलियावर पहिला मालिकाविजय

वृत्तसंस्था/ कोलंबो

सामनावीर चरिथ असालंकाचे शानदार शतक (110) आणि गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या जोरावर यजमान लंकेने चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केवळ 4 धावांनी पराभव करून मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत ऐतिहासिक मालिकाविजय निश्चित केला. गेल्या तीन दशकांत लंकेने मायभूमीत बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मिळविलेला हा पहिलाच मालिकाविजय आहे.

Advertisements

प्रेमदासा स्टेडियमवर झालेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा झाला. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर 3 बाद 34 अशी खराब सुरुवात झाल्यानंतरही लंकेने 49 षटकांत सर्व बाद 258 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सर्व बाद 254 धावांवर रोखत लंकेने केवळ 4 धावांनी रोमांचक विजय मिळविला.

लंकेच्या डावात धनंजय डिसिल्वा (61 चेंडूत 60) व चरिथ असालंका यांनी डाव सावरताना 101 धावांची भागीदारी केली. मिशेल मार्शने डिसिल्वाला बाद करीत ही जोडी फोडली. असालंकाने एका बाजूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झुंजार लढत देत पहिले वनडे शतक नोंदवले. 110 धावांवर पॅट कमिन्सने त्याची खेळी संपुष्टात आणली. याशिवाय दुनिथ वेलालगे (19) व वणिंदू हसरंगा (नाबाद 21) यांनी संघाला 258 धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्स, मिशेल मार्श, मॅथ्यू कुहेनमन यांनी प्रत्येकी 2 तर मॅक्सवेलने एक गडी बाद केला.

259 धावांचा पाठलाग करताना कर्णधार फिंच तिसऱयाच षटकात शून्यावर बाद झाला. वॉर्नर व मार्श यांनी 63 धावांची भागीदारी करीत थोडाफार डाव सावरला. मार्श 26 धावा काढून बाद झाल्यानंतर लाबुशाने (14), यष्टिरक्षक ऍलेक्स कॅरे (19) यांना मोठे योगदान देता आले नाही. ट्रव्हिस हेडने (27) वॉर्नरला चांगली साथ देत 58 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. हेडला डिसिल्वाने बाद करीत ही जोडी फोडली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 189 धावांत तंबूत परतला होता. नंतर मॅक्सवेल व वॉर्नरही पाठोपाठ बाद झाल्याने लंकेची बाजू वरचढ ठरली. वॉर्नरने 112 चेंडूत 12 चौकारांसह 99 धावा जमविल्या. ग्रीन व कमिन्स यांनी 31 धावांची भागीदारी करून संघाला विजयासमीप आणले. शेवटच्या षटकात कुहेनमनने (15) विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाल्याने लंकेला 4 धावांनी विजय मिळाला. लंकेच्या डीसिल्वा, व्हान्डरसे, चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः लंका 49 षटकांत सर्व बाद 258 (असालंका 11, डीसिल्वा 60, कमिन्स 2-37), ऑस्ट्रेलिया 50 षटकांत सर्व बाद 254 (वॉर्नर 99, कमिन्स 35, हेड 27, कुहेनमन 15, करुणारत्ने 2-19, व्हान्डरसे 2-40, धनंजय डीसिल्वा 2-39).

Related Stories

कर्नाटक, तामिळनाडूची अंतिम फेरीत धडक

Patil_p

पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव

Patil_p

निकोलस पूरन, रोस्टन चेस विंडीजचे उपकर्णधार

Patil_p

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण बाद फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता

Patil_p

बांगलादेशच्या फलंदाज प्रशिक्षकपदी सिडॉन्स

Amit Kulkarni
error: Content is protected !!