Tarun Bharat

दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाला लंकेचे चोख प्रत्युत्तर

तिसऱया दिवसाच्या खेळात निदर्शकांचा स्टेडियमबाहेर गोंधळ

वृत्तसंस्था/ गॅले

येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 364 या धावसंख्येला यजमान लंकेने चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 184 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात लंकेच्या जयसूर्याने 118 धावात 6 गडी बाद केले. सध्या श्रीलंकेत अराजक स्थिती असून काही निदर्शकांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच बरेच निदर्शक स्टेडियमबाहेर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 364 धावा जमविल्या. लंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज गुंडाळले. जयसूर्याने 118 धावात 6 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 298 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 5 गडी केवळ 35 धावांमध्ये तंबूत परतले. कसोटी पदार्पणातच प्रभात जयसूर्याने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर लंकेला भक्कम स्थितीत नेले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात लाबूशानेने 156 चेंडूत 12 चौकारांसह 104 तर स्टीव्ह स्मिथने 272 चेंडूत 16 चौकारांसह नाबाद 145 धावा झळकविल्या. उस्मान ख्वाजाने 4 चौकारांसह 37 तर हेडने 12, कॅरीने 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. 110 षटकात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 364 धावात आटोपला. जयसूर्याने 6 तर रजिताने 70 धावात 2 तसेच रमेश मेंडीस आणि महेश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेने दिवसअखेर 63 षटकात 2 बाद 184 धावा जमविल्या. लंकेतर्फे कर्णधार करुणारत्ने आणि रमेश मेंडीस यांनी अर्धशतके झळकवली. लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील 9 व्या षटकात स्टार्कने लंकेचा सलामीचा फलंदाज निशांकाला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार करुणारत्ने आणि मेंडीस यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 152 धावांची भागिदारी केली.

स्वेप्सनने करुणारत्नेला पायचीत केले. त्याने 10 चौकारांसह 86 धावा झळकवल्या. दिवसअखेर कुशल मेंडीस 9 चौकारांसह 84 तर मॅथ्यूज 6 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क आणि स्वेप्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. लंकेचा संघ अद्याप 180 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. या दुसऱया कसोटीत लंकेने आपली स्थिती मजबूत केली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी केवळ तीन दिवसांत जिंकली होती.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव 110 षटकात सर्वबाद 364 (लाबूशाने 104, स्टीव्ह स्मिथ नाबाद 145, ख्वाजा 37, हेड 12, कॅरे 28, प्रभात जयसूर्या 6-118, रजिता 2-70, रमेश मेंडीस 1-117, महेश तिक्षणा 1-48), लंका प. डाव 63 षटकात 2 बाद 184 (निशांका 6, करुणारत्ने 86, कुशल मेंडीस खेळत आहे 84, मॅथ्यूज खेळत आहे 6, स्टार्क 1-23, स्वेप्सन 1-31).

कसोटी पदार्पणात 5 बळी घेणारे लंकन खेळाडू

गोलंदाज / पृथक्करण / वर्ष / ठिकाण

प्रवीण जयविक्रमा / 6-92 व 5-86 / 2021 / पल्लेकेले

प्रभात जयसूर्या / 6-118 / 2022 / गॅले

उपूल चंदना / 6-179 / 1999 / ढाका

अकिला धनंजया / 5-24 / 2018 / मिरपूर

कोसला कुरुप्पुराची / 5-44 / 1986 / कोलंबो

लसिथ एम्बुल्डेनिया / 5-66 / 2019 / दरबान

Related Stories

सिडनी मैदानावर ख्वाजाचे सलग तिसरे शतक

Amit Kulkarni

..तर ऑलिम्पिक रद्द करावे लागेल

Patil_p

डेन्मार्क 1992 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

पाकिस्तान अद्याप 42 धावांनी पिछाडीवर

Patil_p

श्रीलंका-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Patil_p