वृत्तसंस्था/ ढाका
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी बांगलादेशच्या पहिल्या डावातील 365 धावसंख्येला चोख प्रत्युत्तर देताना लंकेने पहिल्या डावात 2 बाद 143 धावा जमविल्या. बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने नाबाद 175 तर लिटॉन दासने 141 धावा झळकविल्या. लंकेच्या रजिताने 5 तर असिता फर्नांडोने 4 गडी बाद केले. लंकेच्या पहिल्या डावात ओशादा फर्नांडो आणि कर्णधार करुणारत्ने यांनी अर्धशतके झळकविली.
या कसोटीत बांगलादेशने 5 बाद 277 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. मुशफिकुर रहीम आणि लिटॉन दास यांनी आपली वैयक्तिक शतके झळकविताना सहाव्या गडय़ासाठी 272 धावांची विक्रमी भागीदारी केली. मंगळवारी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर आठव्या षटकात रजिताने लिटॉन दासला मेंडिसकरवी झेलबाद केले. त्याने 246 चेंडूत एक षटकार 16 चौकारासह 141 धावा झळकविल्या. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचे तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. उपाहारावेळी बांगलादेशने 9 बाद 361 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव काही मिनिटातच 116.2 षटकात 365 धावांवर आटोपला. मुशफिकुर रहीमने 355 चेंडूत 21 चौकारासह नाबाद 175 धावा झळकविल्या. दास आणि रहीम यांची सहाव्या गडय़ासाठीची ही विक्रमी भागीदारी आहे. लंकेतर्फे रजिताने 64 धावांत 5 तर असिता फर्नांडोने 93 धावात 4 गडी बाद केले.
ओशादा फर्नांडो आणि कर्णधार करुणारत्ने यांनी लंकेच्या डावाला सावध सुरुवात करताना 25.5 षटकात 95 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या इबादत हुसेनने ओशादा फर्नांडोला झेलबाद केले. त्याने 91 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 57 धावा जमविल्या. दुसऱया दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी बांगलादेशच्या शकीब अल हसनने कुशल मेंडिसला 11 धावावर पायचित केले. लंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 46 षटकात 2 बाद 143 धावा जमविल्या. करुणारत्ने 7 चौकारासह 70 धावा खेळत असून नाईट वॉचमन रजिताने आपले खाते उघडलेले नाही. बांगलादेशतर्फे इबादत हुसेन आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. या दुसऱया सामन्यात लंकेचा संघ 222 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प. डाव 116.2 षटकात सर्वबाद 365 (मुशफिकुर रहीम नाबाद 175, लिटॉन दास 141, टी. इस्लाम 15, रजिता 5-64, असिता फर्नांडो 4-93), लंका प. डाव 46 षटकात 2 बाद 143 (करुणारत्ने खेळत आहे 70, ओशादा फर्नांडो 57, कुशल मेंडिस 11, इबादत हुसेन 1-31, शकीब अल हसन 1-19).