समन्वयक महेश केरकरा यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी सोमवार दि. 6 रोजी बेळगावमध्ये येत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर ते बेळगावात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली आहे. क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला असणार आहे, अशी माहिती कार्यक्रम समन्वयक महेश केरकरा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या निमित्ताने सोमवारी विविध धार्मिक विधी, महासत्संग, सार्वजनिक सभेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये भक्तांना ध्यान, नाम जप व गाण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तत्पूर्वी रुद्र पूजन आणि शिवाची पूजा करण्याचा पारंपरिक वैदिक सोहळा होणार आहे. शिवाय गुरुदेव कपिलेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक व हजारो भक्त उपस्थित राहणार आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने हिंसामुक्त आणि तणावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कारागृह, गाव, शाळा आणि शहरांमध्ये नागरिकांसाठी स्वयं सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शिवाय दुर्गम भागातील 80 हजार विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण दिले आहे. शिवाय हजारो तरुणांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. दिपाली पाटील, रवि हिरेमठ, प्रवीण शेरी, हर्षद पत्रावळी, यादव आदी उपस्थित होते.