वृत्तसंस्था/ मेरठ
उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील सोसायटीत महिलेशी गैरवर्तन करणारा राजकीय नेता श्रीकांत त्यागीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी इनाम जाहीर केले होते. त्यागी आणि त्याच्या 3 सहकाऱयांना पोलिसांनी मेरठमध्ये अटक केली आहे. श्रीकांतचे लोकेशन त्याच्या पत्नीच्या फोनमुळे पोलिसांना प्राप्त झाले. त्याच्या विरोधात गँगस्टर कायदा लागू करत मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे नोएडाचे पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी म्हटले आहे.
24-36 तासांत कारवाई झाल्याने कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास वाढला असल्याचे उद्गार भाजप खासदार महेश शर्मा यांनी काढले आहेत. ग्रँड ओमेक्स सोसायटीतून फरार झाल्यावर त्यागीने मेरठमधील स्वतःच्या नातेवाईकाकडे आश्रय घेतला हाता. सोमवारी रात्री त्यागीने स्वतःच्या पत्नीला कॉल केला होता. पोलिसांना याचमुळे त्याच्या ठावठिकाण्याचा सुगावा लागला. पोलिसांनी मंगळवारी सकाळी अनु त्यागीला ताब्यात घेत चौकशी केली. तिच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली, त्याच आधारावर पोलिसांना श्रीकांत त्यागीला जेरबंद करता आले.
श्रीकांत त्यागीबद्दल ‘ज्याचे सरकार, त्याचा श्रीकांत’ असे बोलले जायचे. सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्याची ऊठबस होती. त्याच्या विरोधात 6 गुन्हे नोंद आहेत. नोएडा येथे त्याच्या नावावर 40 दुकाने आढळून आली आहेत. तसेच अनेक भूखंड त्याच्या मालकीचे आहेत. प्रशासन आता श्रीकांत त्यागीचे अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्याची योजना आखत आहे.
नोएडा येथील एका सोसायटीत श्रीकांत त्यागीने अवैध कब्जा केला होता. त्याचा हा कब्जा हटविण्यासाठी एका महिलेने तेथे रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली होती. याची माहिती कळताच श्रीकांत त्यागीने राजकीय संबंधांचा धाक दाखवत महिलेसोबत गैरवर्तन केले होते. या घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.