बेळगाव : पायाला गंभीर दुखापत होऊनही त्या दुखापतीवर मात करत कोल्हापूर येथे झालेल्या ट्रायथ्लॉन स्पर्धेत महिला विभागात सृष्टी पाटीलने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले. कडोलीच्या या कन्येने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणता येते हेच सिद्ध केले.
सृष्टी पाटील ही गेले अनेक महिने कोल्हापूर येथील राजारामपुरीतील तलावात आंतरराज्य निमंत्रितांच्या ट्रायथ्लॉन स्पर्धेचा सराव करीत होती. दुर्दैवाने घरी परतत असताना अपघात होवून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी 6 महिने विश्रांतीचा सल्ला दिला होता. सृष्टीने धीर न सोडता सरावाला सुरूवात केली. सरावाच्या वेळी वेदना होत होत्या. पण त्याचा विचार न करता सृष्टीने कसून सराव केला आणि स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा पूर्ण करणे हे सृष्टीसमोर अवघड आव्हान होते. त्याला सामोरे जात तिने 1.9 किमी पोहणे, 90 किमी रोड सायकलींग व 21.1 किमी अनवाणी पायाने धावणे 10 तासात पूर्ण करीत महिलांच्या खुल्या गटात सुवर्णपदक पटकावले.
सृष्टी ही कडोलीचे प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते अरुण व वंदना पाटील यांची ती कन्या होय. ती रोज 40 किमी सायकलींग व दोन तास पोहण्याचा सराव करते. तिला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितेश कुडुचकर व गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन तर अरूण व वंदना पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.