विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता शिगेला
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर दोन वर्षांच्या अंतराने नियमित पद्धतीने यावषी दहावीच्या परीक्षा पार पडल्या. दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळणार? याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुरुवारी दुपारी 12.30 वाजता शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.
शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी गुरुवार दि. 19 रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर होणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षेमध्ये शिथिलता आणली होती. यावषी मात्र संपूर्ण शैक्षणिक वर्ष योग्य पद्धतीने पार पडल्यामुळे नियमित पद्धतीने परीक्षा घेतल्या. हिजाबप्रकरण ताजे असतानाच दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाल्याने बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे कडक बंदोबस्तही ठेवला होता. दरम्यान, ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार असून www.karresultls.nic.in व sslc.karnataka.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरही एसएमएसद्वारे निकाल मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी असाही फंडा…
विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कॉलेजकडून अनोखे फंडे वापरले जात आहेत. गुरुवारी निकाल लागणार असल्याने आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकने अनोखा फंडा केला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये दहावीचा निकाल पहा आणि मोफत प्रिंट काढून घ्या, असा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत आणण्यासाठी, असे उपक्रम राबविले जात आहेत.