ऑनलाईन टीम / मुंबई :
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर लालपरीची चाके आता रूळावर आली आहेत. लालपरी सध्या सुसाट असून, दीड महिन्यात तिने तब्बल 521 कोटींची कमाई केली आहे. (st bus revenue of rs 521 crore in one and half month)
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले नसले तरीही वेतनवाढ आणि कर्मचाऱ्यांना पगाराची हमी मिळाली. त्यामुळे तब्बल पाच महिने आंदोलनाचा लढा देऊन 22 एप्रिलपासून बहुतेक कर्मचारी कामावर रुजू झाले. सध्या 91 हजार कर्मचारी कामावर रूजू झाले असून, 14 हजार एसटी बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. लालपरीचे दिवसाचे उत्पन्न आता 17 कोटींवर पोहचले आहे. 1 एप्रिल 2022 ते रविवारी 15 मे 2022 या दीड महिन्यातच लालपरीने तब्बल 521 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आजही लालपरीवर तितकाच विश्वास असल्याचे दिसून येते.
खासगी वाहनांचे दर परवडणारे नसल्याने लालपरीचाच सर्वसामान्यांना मोठा आधार आहे. मागील 15 दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सोळाशेंची वाढ झाली आहे. कर्मचारीही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून पगार वेळेत होईल, हा त्यामागील हेतू असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.