रेहान सर्वोत्तम खेळाडू, ऋषिकेश उत्कृष्ट गोलरक्षक
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघटना आयोजित निमंत्रितांच्या कोलेहट्टी षण्मुगम चषक आंतरशालेय आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या सेंट झेवियर्स संघाने अंतिम सामन्यात गडहिंग्लज हायस्कूल संघाचा 4-0 असा पराभव करून कोलेहट्टी षण्मुगम चषक पटकाविला. रेहान किल्लेदारला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
गडहिंग्जल युनायटेड फुटबॉल क्लबच्या मैदानावर आयोजित निमंत्रितांच्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या सेंट झेवियर्स संघाने पहिल्या सामन्यात जागृती हायस्कूल संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात आर्य गायकवाड, पंकज अनगोळकर, स्पर्श देसाई व रेहान किल्लेदार यांनी गोल केले. उपांत्य सामन्यात बेळगावच्या बलाढय़ सेंट पॉल्स संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात रिहान किल्लेदारच्या पासवर तनिष्क अंकलेने गोल नोंदवला. या एकमेव गोलाच्या जोरावर सेंट पॉल्सचा पराभव करून सेंट झेवियर्सने अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामना गडहिंग्लज हायस्कूल गडहिंग्लज व बेळगावच्या सेंट झेवियर्स यांच्यात झाला. या सामन्यात दहाव्या मिनिटाला झेवियर्सच्या रेहान किल्लेदारने, 22 व्या मिनिटाला स्पर्श देसाईने, 37 व्या मिनिटाला अयान किल्लेदारने, 52 व्या मिनिटाला रेहान किल्लेदारने गोल नोंदवले. गडहिंग्लज संघाला मात्र गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स व उपविजेत्या गडहिंग्लज हायस्कूल संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून अयान किल्लेदार, उत्कृष्ट गोलरक्षक ऋषिकेश गोदवानी तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेहान किल्लेदार, सेंट झेवियर्स यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.