प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील विमानतळ आणि संजीवनी एन. आर. एल. एम. जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात महिला बचत गटांसाठी वस्तु प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या स्टॉलचा उपयोग करून घेऊन स्वतः बनविलेल्या वस्तुंची विक्री करून स्वावलंबी बनावे असे आवाहन दर्शन एच. व्ही. यांनी केले. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य म्हणाले, राज्यात प्रथमच बेळगावमध्ये महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढे हा स्टॉल महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी खुला असणार आहे.
जिल्हा पंचायतचे योजना निर्देशक रवी बंगारा, सांबरा ग्रां. पं. च्या अध्यक्षा व सदस्य विमानतळ सल्लागार कमिटीचे सदस्य, जिल्हा पंचायत व तालुका पंचायतचे माजी सदस्य यासह इतर उपस्थित होते.