मतदान टाळून सत्ताधारी भाजप, विरोधी गोवा फॉरवर्ड गटाकडून सामंजस्याचे दर्शन, दोन्ही समित्यांवर विरोधकांनाही स्थान
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या स्थायी तसेच मार्केट समितीची निवड करताना सत्ताधारी भाजप गट तसेच विरोधी गोवा फॉरवर्ड गटात संघर्ष होईल काय याबाबत चर्चा होती. मात्र उभय गटांनी समझोत्याने या समित्यांची निवड करण्यावर भर दिल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे दोन्ही समित्यांची निवड बिनविरोध झाल्याने मतदान घेण्याची आवश्यकता भासली नाही.
स्थायी समितीवर सहा सदस्यांची निवड करण्यात येते. त्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची आपोआप वर्णी लागते, तर अन्य सहा सदस्यांची निवड करावी लागते. यावेळी सहाच्या जागी सात नगरसेवकांचे अर्ज आले होते. मात्र नगरसेवक व्हितोरिनो तावारीस यांना अनुमोदन दिलेले घनश्याम शिरोडकर यांनी आपले नाव घनश्याम शिरोडकर प्रभू शिरोडकर असे लिहिले. प्रत्यक्षात ते घनश्याम प्रभू शिरोडकर श्रीधर असे लिहणे आवश्यक होते. त्यामुळे तावारीस यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला नाही.
यामुळे स्थायी समितीची निवड बिनविरोध झाली. या समितीवर नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, डॉ. रोनिता आजगावकर, स्वेता लोटलीकर, लता पेडणेकर, मिलाग्रिना गोम्स, फ्रान्सिस जोनास, निमिषा फालेरो यांची बिनविरोध निवड झाली आहे. सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यासह 6, तर विरोधी गटाच्या दोन नगरसेवकांची या स्थायी समितीवर वर्णी लागली.
मार्केट समितीसाठीही मतदान टळले
मार्केट समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्षांची आपोआप निवड होत असते, तर अन्य चार सदस्यांची निवड करावी लागते. यासाठी 5 अर्ज आले होते. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ दिली असता सत्ताधारी गटातील नगरसेवक दामोदर वारक यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने मतदान टळले. अन्यथा मतदान घ्यावे लागले असते. वरील समित्यांची मतदान प्रक्रिया एकदम किचकट असते. एका मताचे मूल्यांकन विशिष्ट प्रकारे करावे लागते. त्यामुळे या समित्या सामंजस्याने निवडण्याकडे सत्ताधाऱयांचा कल असतो व हाच सामंजस्यपणा सत्ताधारी व विरोधकांनी शुक्रवारी दाखविल्याचे दिसून आले. काही वर्षांपूर्वी एकदा मतदान घ्यावे लागले होते व हे प्रकरण नंतर उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.
भाजप व गोवा फॉरवर्डदरम्यान संबंध संघर्षमय असले, तरी कालच्या बैठकीत सत्ताधारी भाजपाने बहुमत असूनही मतदान टाळणे आवश्यक असल्याने विरोधकांना वरील दोन्ही समित्यांत स्थान दिले. मतदान घेणे भाग पडल्यास त्यासाठी सभागृहात मतपेटी आणण्यात आली नव्हती. यामुळे सामंजस्यपणाने निवड प्रक्रिया राबविण्याचे ठरवून नगराध्यक्ष शिरोडकर यांच्यासह सत्ताधारी गट आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पालिका सेनिटरी तसेच ग्रंथालय समित्यांचीही सामंजस्याने निवड केली जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. मार्केट समितीवर उपनगराध्यक्षा दिपाली सावळ या अध्यक्ष असून त्यावर सत्ताधारी गटातील नगरसेवक राजू नाईक व महेश आमोणकर, तर विरोधी गटातील पार्वती उर्फ सुनीता पराडकर व जॉनी क्रास्टो यांचा समावेश आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.
17 लाखांची थकबाकी वसूल
मडगाव पालिकेने थकबाकी वसुलीसाठी खास मोहीम हाती घेतली असून मागील पाच दिवसांत सुमारे 17 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. आपण थकबाकी वसुलीत खास लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेकडे असलेल्या तीन मार्केट निरीक्षकांपैकी दोन निरीक्षकांना कर थकबाकी, जी कोटय़वधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे, त्याची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी सोमवारपासून हाती घेतलेल्या खास मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. दोन वेगवेगळी पथके राबवून वसुली केली जात असून वसुली अधिकारी थेट आस्थापनाच्या मालकाकडे जाऊन ही मोहीम राबवत आहेत. त्यांना हे दोन मार्केट निरीक्षक सहकार्य करत आहेत. ही मोहीम दीर्घकाळ सुरू ठेवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.